Breaking News

विकास आणि राष्ट्रवादाचा विजय, नकारात्मकतेला मूठमाती

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी 10 मार्च 2019 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात भारताच्या 17व्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आणि संपूर्ण देशात सात टप्प्यात मतदान घेण्यात आले. 19 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीसह 59 मतदारसंघात सातव्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर 23 मे 2019 रोजी मतमोजणी घेण्यात येऊन तब्बल 75 दिवसांचा हा संपूर्ण राष्ट्रीय महोत्सव सोहळा अपूर्व उत्साहात झाला. 2014 नंतर या देशात राष्ट्रीय पातळीवर राजकीय क्षीतिजावर नरेंद्र दामोदरदास मोदी नावाचे एक जबरदस्त व्यक्तीमत्व अवतरले आणि हां हां म्हणता या मोदी नावाने भारतीय जनतेवर एक अद्भूत ’मोहिनी’ घातली.

भारतीय राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या 543 पैकी 282 जागा मिळाल्या होत्या. मनात आणलं असतं तर नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे एकहाती सरकार बनवू शकले असते. परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्वच घटक पक्षांना आपल्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये सामावून घेतले. काही नतद्रष्ट व्यक्तींंमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांना बदनाम व्हावे लागले. परंतु  10 ’जाणते राजे’ बगलेत मारुन फिरेल असा एक चाणक्य 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्रात नेतृत्व करता जाहला.

अशा देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी साडेचार वर्षे सगळं सहन करुन शिवसेनेला सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वरळीच्या हॉटेलमध्ये एका मंचावर आणले आणि 18 फेब्रुवारी 2019 रोजी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती पक्की झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यापूर्वी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे वांद्रे कुर्ला संकुलात असलेल्या सॉफिटेलमध्ये तसेच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासमवेत चर्चा करुन युतीच्या संदर्भातला हलवून खुंटा मजबूत केला. वरळीच्या हॉटेलमध्ये युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि 17व्या लोकसभेचे रणशिंग फुंकण्यासाठी युतीचे नेते सिद्ध झाले. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम आणि सदाभाऊ खोत यांची महायुती पक्की झाली. वरळीच्या हॉटेलमध्ये अयोध्येत भव्य राममंदिर, शेतकर्‍यांना कर्जमाफी, नाणार प्रकल्प रद्द करणे, मुंबई, ठाण्यात पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकाधारकांना मालमत्ता करातून मुक्ती या मुद्द्यावर एकवाक्यता करण्यात आली. 10 मार्च 2019 रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर देशपातळीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाराष्ट्रातील महायुती यांनी या निवडणुका जिंकून पुन्हा एकदा देशात सत्ता स्थापन करण्याचा विडा उचलला. एका बाजूला नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबुतीने प्रचारासाठी उतरली होती तर दुसर्‍या बाजूला 56 इंचाच्या जबरदस्त छातीसमोर 56 पक्ष लढण्याची तयारी करीत होते.

एकमेकांची तोंडे न पाहणारे गळ्यात गळा घालताना तंगड्यात तंगड्या पण अडकवून बसले होते. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मदतीला प्रियांका गांधी प्रचारासाठी मैदानात उतरल्या होत्या आणि मग (काही अपवाद वगळता) तमाम मीडियावाले इंदिरा गांधी आणि प्रियांका गांधी यांची तुलना करताना थकत नव्हते. प्रियांका राहुलच्या मदतीला आल्या, त्यांना काँग्रेसचे महासचिव बनवले मग काय राफेलपासून चौकीदारपर्यंत खोट्या प्रचाराचा धुरळा उडवण्यात आला. ’खोटे बोल पण रेटून बोल’ यात प्रत्येक विरोधी नेत्यांमध्ये जणुकाही स्पर्धाच लागली होती. याचवेळी राहुलबाबाला सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागली. पण सर्वोच्च न्यायालयात माफी मागून पुन्हा जाहीर प्रचार सभेत चौकीदार बद्दल घोषणा बिनदिक्कतपणे देण्यात येत होत्या.

देशपातळीवर महाआघाडीत एकवाक्यता दिसत नव्हती. तिथे मायावती, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, चंद्राबाबू नायडू धडपडत होते. पण उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या ’हाता’त हात द्यायला मायावती, अखिलेश तयार नव्हते. नवी दिल्लीच्या सात जागांसाठी अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर शीला दीक्षित ’हात’मिळवणी करायला तयार नव्हत्या. राष्ट्रीय पातळीवर एका बाजूला भरभक्कम राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवीत असताना दुसर्‍या बाजूला दिशाहीन, भरकटलेल्या, विस्कळीत अशा विरोधकांमध्ये ’सामना’ सुरु झाला.  जबरदस्त आत्मविश्वास असलेले नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे झंझावाती प्रचार करीत होते. एखाद दोन वाहिन्या सोडल्यास सर्व मीडिया भाजप आणि मित्रपक्षांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करुन झोडपण्याचा प्रयत्न करीत होता.  मग महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपवर साडेचार वर्षात कितीवेळा टीका आणि आरोप केले याचा उगाळून उगाळून लेप तयार करुन बरे न होऊ घातलेल्या विरोधकांना चोपडण्याचा निरर्थक प्रयत्न करीत होते. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवेसी यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी बनविली आणि काँग्रेस तसेच शरद पवार यांच्यावर आरोप करीत महाराष्ट्रात सर्वच 48 जागांवर उमेदवार उभे केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी 2014 साली महाराष्ट्रात महायुती बनविताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सोबत घेतले होते. पण 3 जून 2014 रोजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नवी दिल्ली येथे अपघाती निधन झाल्यानंतर राजू शेट्टी हे नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीकेची झोड उठवीत भाजप आघाडीतून वेगळे झाले. ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन बसले. महाराष्ट्रात याचवेळी ’राज’कारण रंगू लागले. देशपातळीवर नोटाबंदीमुळे ममता थयथयाट करीत होत्या तर महाराष्ट्रात मुंबईत कृष्णकुंजवर ’खळ्ळखट्याक’ सुरु होता. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील, हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव रणजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करते झाले तर निवेदिता माने आणि त्यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांनी घड्याळ फेकून देत हाती शिवबंधन बांधले. 2009 साली मोहिते पाटील कुटुंबातील वाद सोडविण्यासाठी गेलेले शरद पवार स्वतःच बोहल्यावर उभे राहिले आणि सुभाष देशमुख यांचा पराभव करुन लोकसभेत पोहोचले पण 2014 साली विजयसिंह मोहिते पाटील यांना लोकसभेत पाठवून स्वतः राज्यसभेत गेले. यापुढे लोकसभा निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा पवार यांनी केली. परंतु जशा 2019च्या निवडणुका जवळ आल्या तसे शरद पवार माढ्यासाठी सरसावले.

बारामती सुप्रिया सुळे यांच्यासाठी राखूनच ठेवली होती. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ याची इच्छा मावळ लोकसभा लढवायची होती, पण पवार आजोबांनी विरोध केला. पण जेव्हा माढ्यात आपल्या डोळ्यासमोरच शेखर गोरे आणि कार्यकर्ते हमरीतुमरीवर आले तेव्हा आपले काही खरे नाही, हा विचार करुन पवार आजोबा मैदानातून मागे हटले. त्यांनी पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखविला. याच कालावधीत रोहित राजेंद्र पवार या नातवाने पवार आजोबांना ’आजोबा, माढा लढवाच!’ असा बालहट्ट चेहर्‍याच्या पुस्तकावर (फेसबुकवर) नमूद केला. शरद पवार यांच्या कुटुंबातील आणखी एका तरुणाचा राजकीय क्षीतिजावर उदय होतोय की काय? अशी चर्चा सुरु झाली. दुसर्‍यांच्या पोरांना सांभाळण्याचा काय ठेका घेतला आहे काय? अशा ’डायलॉग’ ने महाराष्ट्र ढवळून काढला आणि त्याला मग उद्धव ठाकरे यांनी सणसणीत मुँहतोड जवाब दिला. महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019, 18 एप्रिल 2019, 23 एप्रिल 2019 आणि 29 एप्रिल 2019 अशा चार टप्प्यात सतराव्या लोकसभेसाठी 48 मतदारसंघात मतदान झाले. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या उमेदवारी अर्ज भरताना अहमदाबाद आणि वाराणसी येथे लावलेली हजेरी तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत दाखविलेली उपस्थिती हे परिपक्व राजकारणी असल्याचे द्योतक ठरले. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये असलेला समन्वय, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये निर्माण झलेले सौहार्दाचे वातावरण, दोन्ही पक्षांनी दाखवून दिलेले सामंजस्य आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमधील परस्पर सहकार्याची भावना शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा याबरोबरच नेत्यांनी दाखविलेला जबरदस्त आत्मविश्वास यामुळे 24 मे 2019 रोजी झालेल्या मतमोजणीमध्ये जे चित्र समोर आले त्यावरुन विकास आणि राष्ट्रवादाचा ऐतिहासिक अभूतपूर्व असा विजय आणि नकारात्मकतेला भारतातल्या एकशेतीस कोटी जनतेने दिलेली मूठमाती असेच म्हणावे लागेल. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या नंतर नरेंद्र मोदी यांनी विक्रमी विजय संपादन केला आहे.

भारतात बिगर काँग्रेसी असे नरेंद्र मोदी हे 303 जागा पटकावणारे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. नरेंद्र मोदींमुळे देशाला आणि या देशाच्या राजकारणाला एक सर्वोच्च दर्जा प्राप्त झाला आहे. मतदार हा राजा असतो आणि तोच योग्य निर्णय घेतो. त्यामुळे या मतदार राजाला मूर्ख समजण्याचे पाप राजकारण्यांनी (तसेच समाजातील सर्वच घटकांनी) निश्चितच करु नये. 2019 मध्ये कोणता निर्णय घ्यायचा हे या मतदार राजाने पक्के ठरविले होते आणि त्याप्रमाणे त्याने तो निर्णय घेतला आहे. त्याचा योग्य तो सन्मान राखा. विजय हा विनयाने आणि पराभव हा खिलाडूवृत्तीने स्वीकारला पाहिजे. आपण निवडून आलो तेंव्हा मतदान यंत्रे सुस्थितीत आणि आपला पराभव झाला तर मतदान यंत्राचा घोटाळा? असा दळभद्रीपणा नेत्यांनी करावा, हे दुर्दैव म्हणावे लागेल. मतदान यंत्रांबद्दल थयथयाट करणार्‍या चंद्राबाबू नायडू यांना बसलेली सणसणीत चपराक 2024 पर्यंत त्यांना आपला लाल झालेला गाल घेऊनच फिरावे लागेल. नितीश कुमार, उद्धव ठाकरे, रामविलास पासवान, रामदास आठवले यांनी जो राजकीय शहाणपणा, दूरदृष्टी दाखविली ती चंद्राबाबू यांनी दाखविली असती तर त्यांना अच्छे दिन निश्चितच पहायला मिळाले असते. असो, असतं एखाद्याचं नशीब. नवीन पटनाईक, जगनमोहन रेड्डी हे अशी दूरदृष्टी दाखवतील असे वाटते. दोन वर्षांपूर्वी पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर जो दर्जा भारताला मिळवून दिला त्यावरुन जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक महत्त्वाचे विधान केले होते. मोदीविरोधकांनो, 2019 विसरा आणि 2024ची तयारी करा. मोदींना टक्कर देणारा तेवढ्याच ताकदीचा नेता आत्ता तरी डोळ्यासमोर दिसत नाही ओमर अब्दुल्ला यांच्या विधानाचा अर्थच विरोधकांना कळला नाही.

56 इंचाची हेटाळणी करणारे 56 पक्षांचे नेते सतत अंधारात चाचपडत होते. भारतीय जनता पक्षाने 303 जागा पटकावताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 353 जागा मिळविल्या. लोकसभेत 543च्या सभागृहात विरोधी पक्षनेते होण्यासाठी आवश्यक ती संख्या सुद्धा यावेळीही काँग्रेसच्या ’हाता’त येऊ शकली नाही. 2014 ची पुनरावृत्ती होतांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी ने मजबूत स्थान पटकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या अभूतपूर्व, ऐतिहासिक यशाबद्दल डोनाल्ड ट्रम्प, नेतन्याहू, जिनपिंग, पुतीन, यांच्या सह सर्वच राष्ट्रप्रमुखांनी अभिनंदन केले आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी च्या अभूतपूर्व यशाची चर्चा आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांना जनतेने नाकारले, महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे हेही पराभूत झाले. निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बदलण्याची कारवाई आणि राहुल गांधी यांचा मुंबईतील रोड शो आणि जाहीर सभा न होणे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा देणे, पक्षाच्या नेतृत्वाची औदासिन्यता, उमेदवारीबद्दल नाराजी अशा असंख्य गोष्टींचा कार्यकर्त्यांवर झालेला विपरीत परिणाम, आता आत्मचिंतन आणि समीक्षेसाठी कोण पुढाकार घेणार? महात्मा गांधी यांची सूचना अंमलात येणार? काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि निष्ठावंत नेते प्रा. अनंत विठ्ठलराव गाडगीळ हे वारंवार सावधानतेच्या सूचना, इशारे देत होते पण त्यांच्याकडे पक्षाने, नेतृत्वाने पद्धतशीर दुर्लक्ष करुन अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार्‍या प्रसिद्धीसाठी हापापलेल्यांनी पक्षाला तळागाळात नेण्याऐवजी पक्षाला गाळात घालण्यातच धन्यता मानली.

अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, अनंत गीते यांना पराभव पत्करावा लागला. दिग्गज प्रस्थापितांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसला. शरद पवार यांची कन्या निवडून आली आणि नातू पराभूत झाले. मुंबईतील सहाही मतदारसंघात शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीने पुनश्च घवघवीत यश पटकावले. आता महायुतीची जबाबदारी वाढली आहे. मागच्या चुका सुधारुन, सर्वांना सोबत घेऊन, घमेंड, दुराभिमान बाजूला ठेवून विनम्रपणे काम करावे. ’सबका साथ, सबका विकास’ हे खर्‍या अर्थाने अमलात आणून सर्वांना ’अच्छे दिन’ दाखवावेत. नरेंद्र मोदी, अमित शाह, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या यशासाठी परिश्रम घेणार्‍या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सत्कार्य करण्यासाठी तसेच महाराष्ट्राला अग्रेसर आणि विकसित बनविण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार, त्यांचे सर्व सहकारी आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणा, कोट्यवधी कर्मचारी व अधिकारी यांनी हा ’राष्ट्रीय महोत्सव’ सर्वोत्तम पद्धतीने काम करुन कमालीचा यशस्वी केला. या संपूर्ण यंत्रणेचे मनःपूर्वक अभिनंदन! ही लोकशाही मजबुतीने टिकविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करु या. जयहिंद!!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply