कामोठेकरांचा संताप
पनवेल ः प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग आणि मानसरोवर रेल्वेस्थानक यांना जोडणारा रस्ता हा कामोठ्यातील महत्त्वाचा मुख्य रस्ता आहे. हा रस्ता बर्याच दिवसांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. आता कुठे रस्त्याचे दुरुस्तीकरण होत नाही, तोपर्यंत महापालिका आणि सिडकोच्या परवानगीने इंडस कंपनीने रस्त्याच्या मध्यभागीच मोबाइल टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सदर रस्त्याची पुन्हा वाताहत झाली. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी या कामाला कडाडून विरोध दर्शविला असून, पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना या कामासंदर्भात हरकतीचे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी टॉवरमुळे होणार्या रेडिएशनचा मनुष्य आणि इतर प्राण्यांवर होणार्या दुष्परिणामांचादेखील उल्लेख केला आहे. या मोबाइल टॉवर उभारणीस शुभांगण कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनीदेखील विरोध दर्शविला असून, तसा तक्रार अर्ज पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना सादर केला आहे.