Breaking News

तरुणाला बेदम मारहाण

पनवेल : बातमीदार  : अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करणार्‍या राकेश हरकुळकर (35) याने गुन्हा मागे घ्यावा, यासाठी त्याला अज्ञात चौकडीने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री कामोठे येथे घडली. या मारहाणीत राकेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कळंबोली पोलिसांनी अज्ञात चौकडीवर मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार राकेश हरकुळकर खारघरमध्ये राहण्यास असून सध्या तो स्विगी ऑनलाईन फूड सर्व्हिसमध्ये काम करत आहे. बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास राकेश कामोठे येथे स्विगीची ऑर्डर घेऊन आपल्या स्कुटीवरून जात असताना, लाल रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात चौकडीने राकेशला सायन-पनवेल मार्गावरील कामोठे पुलाजवळ अडविले. त्यानंतर कुणाल सहानी आणि अमोल शिर्के यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यास सांगितले, मात्र राकेशने नकार दिल्याने त्याला लोखंडी रॉड व हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत राकेश गंभीर जखमी झाल्यानंतर चौघे मारेकरी आपल्या कारमधून पनवेलच्या दिशेने पळून गेले. जखमी राकेशला त्याच्या सहकार्‍यांनी एमजीएम रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कळंबोली पोलिसांनी गुरुवारी राकेशच्या तक्रारीवरून अज्ञात चौकडीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राकेश हरकुळकर 2016 मध्ये खारघरमधील बिग सिनेमा व कार्निव्हल सिनेमागृहात ऑपरेशन असोसिएट म्हणून कामाला असताना, कार्निव्हल सिनेमाच्या व्यवस्थापनाने राकेशला जबरदस्तीने स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यास भाग पाडले होते, तसेच त्याला हाऊस किपिंगची कामे करण्यास सांगून कर्मचार्‍यांसाठी असलेल्या लंच रूममध्ये जेवण्यास मज्जाव केला. व्यवस्थापनातील अधिकार्‍यांनी राकेशचा अपमान करून त्याला कामावरून हाकलून दिले. या प्रकारानंतर राकेशच्या तक्रारीवरून खारघर पोलिसांनी मार्च महिन्यामध्ये कार्निव्हल व्यवस्थापनातील अधिकारी व त्यांना सहकार्य करणार्‍या इतर सर्वांवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply