Breaking News

शेकाप नेते पंडित पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांनीही हाती घेतले ‘कमळ’

भाजप प्रदेश कार्याकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले पक्षात स्वागत

मुंबई : प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडितशेठ तथा सुभाष पाटील यांनी बुधवारी (दि.16) भाजप प्रदेश कार्यालयात जि.प. माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, सवाई पाटील यांच्या समवेत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षात स्वागत केले.
या वेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, अविनाश कोळी, कमलाकर दळवी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, सतीश धारप, अ‍ॅड. नीलिमा पाटील, वैकुंठ पाटील, अ‍ॅड. महेश मोहिते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.
या वेळी चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश आणि राज्य विकासाच्या वाटेवर वेगाने जात आहे. या दोघांवर असलेल्या विश्वासामुळे पाटील यांनी शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंडित पाटील हे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात पक्षसंघटनेला अधिक ताकद मिळणार आहे. पंडित पाटील यांचा पक्षात यथोचित सन्मान राखला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
माजी आमदार दिवंगत मीनाक्षी पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तसेच रायगड जिल्हा बँकेचे संचालक आस्वाद पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे सहा माजी सभापती, सात जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा बँकेचे दोन संचालक, आजी माजी 60 सरपंच यांसह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. शेकापमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये जनार्दन पाटील, सुगंधा पाटील, संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, भावना पाटील, संदीप घरत, एकनाथ गायकवाड, वैभव चांदे, वसंत यादव, राजा सानप, स्मिता पाटील, महादेव दिवेकर, सुमन पाटील, प्रीती पाटील, यतीन घरत आदींचा समावेश आहे.

भाजपच्या साथीने जोमाने कार्य करू -पंडित पाटील
मी शेतकरी कामगार पक्षात जीवाचे रान केले, पण तिथे माझ्यावर अविश्वास दाखविला, तर भाजपने माझ्यावर विश्वास दाखविला. भाजप शिस्तबद्ध पार्टी आहे, सर्वांना विश्वासात घेऊन काम करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्याचा सर्वांगीण विकास होणार असल्याने आम्ही भाजपामध्ये प्रवेश केल्याचे पंडित पाटील यांनी सांगितले. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपाच्या साथीने आगामी काळात जोमाने कार्य करून जिल्ह्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष बनवू असा शब्द ही पंडित पाटील यांनी दिला.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply