Breaking News

भारताची ‘स्विंग’समोर शरणागती ; सराव सामन्यात न्यूझीलंडसमोर टाकली नांगी

लंडन : वृत्तसंस्था

कागदावर भारतीय क्रिकेट संघाची फलंदाजी भक्कम वाटत असली, तरी द ओव्हलच्या वेगवान खेळपट्टीवर स्विंग चेंडूंचा सामना करताना फलंदाजांची त्रेधातिरपिट उडाली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून शनिवारी झालेल्या सराव सामन्यात भारताचा डाव अवघ्या 39.2 षटकांत 179 धावांत गुंडाळला. यानंतर विजयी लक्ष्य 37.1 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विजय शंकरच्या हाताला सराव करताना दुखापत झाली होती. त्याची दुखापत गंभीर नसली, तरी तो या सराव सामन्यात खेळू शकला नाही. ट्रेंट बोल्टने दुसर्‍याच षटकात रोहित शर्माला पायचीत टिपले. टप्पा पडताच बोल्टने टाकलेला चेंडू (इन स्विंग) झपकन आत आला. याचा अंदाज रोहितला आला नाही. यानंतर रोहितने ‘रिव्ह्यू’ घेतला, मात्र त्याचा फायदा झाला नाही. यानंतर बोल्टने आपल्या दुसर्‍या षटकात धवनचा अडसर दूर केला. बोल्टने आपल्या तिसर्‍या षटकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळालेल्या लोकेश राहुलचा त्रिफळा उडविला. बोल्टने टाकलेला थोडा उसळी घेतलेला चेंडू हलक्या हाताने खेळण्याची चूक राहुलला महागात पडली. अकराव्या षटकात ग्रँडहोमने कोहलीच्या बॅट आणि पॅडमधून ‘गॅप’ शोधून त्रिफळा उडविला. पंड्याने महेंद्रसिंह धोनीच्या साथीने 38 धावा जोडल्या. 20व्या षटकात नीशमने टाकलेल्या स्विंग चेंडूवर पंड्या चकला आणि तो यष्टिरक्षकाकडे झेल देऊन माघारी परतला. भारताचा निम्मा संघ 77 धावांत माघारी परतला होता. यानंतर नीशमने दिनेश कार्तिक आणि भुवनेश्वरकुमारला माघारी पाठविले, तर टीम साऊदीने धोनीला बाद केले. या वेळी भारताची 8 बाद 115 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. रवींद्र जडेजाने कुलदीप यादवच्या साथीने नवव्या विकेटसाठी 62 धावा जोडल्या. यानंतर बुमराहने दुसर्‍याच षटकात कॉलिन मुन्रोला बाद केले. मार्टिन गप्टीलला पंड्याने माघारी पाठवले. यानंतर केन विल्यमसन आणि रॉस टेलरने तिसर्‍या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. विल्यमसनने 87 चेंडूंत 67, तर टेलरने 75 चेंडूंत 71 धावा केल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर निकोल्स आणि ब्लुंडेलने न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता भारताचा दुसरा सराव सामना 28 मे रोजी बांगलादेशविरुद्ध होईल.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply