नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधात सीबीआयने लूक आऊट नोटीस जारी केली आहे. यानुसार राजीव कुमार यांना परदेश दौरा करायचा असल्यास विमानतळ प्राधिकरण त्याची माहिती सीबीआयला देणार आहे. 23 मे रोजी त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून ती एका वर्षासाठी वैध असेल. राजीव कुमार हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात.
राजीव कुमार यांच्यावर शारदा चिटफंड आणि रोजवेली चिटफंड घोटाळ्याच्या तपासादरम्यान पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याविरोधात अधिक तपास करण्यासाठी सीबीआयने राजीव कुमार यांच्या अटकेची मागणी केली होती, परंतु त्यांना 24 मेपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. त्यानंतर राजीव कुमार यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्याचा कालावधी वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयात त्यांना झटका लागला असून
सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कोलकाता उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले होते. अटकेपासून संरक्षण मिळाल्याचा कालावधी संपल्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, तसेच त्यांच्या उत्तर प्रदेशातील घरासमोरही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त सुरक्षा यंत्रणा राजीव कुमार यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये वकिलांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे राजीव कुमार यांना उच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षणाची याचिका दाखल करता आली नाही. फेब्रुवारी महिन्यात चिटफंड गैरव्यवहारप्रकरणी राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआय अधिकार्यांना पोलिसांनी एका गाडीत कोंडून पोलीस ठाण्यात नेल्याची घटना घडली होती. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष निर्माण झाला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहचले होते.