Breaking News

नेमबाजी विश्वचषकात अपूर्वीचा ‘सुवर्ण’वेध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताच्या अपूर्वी चंदेला हिने सोनेरी लय कायम ठेवताना जर्मनीच्या म्युनिच येथे सुरू असलेल्या वर्षातील तिसर्‍या आयएसएसएफ रायफल पिस्तूल विश्वचषक स्पर्धेत रविवारी चुरशीच्या लढतीत महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. जयपूरच्या या नेमबाजाने अंतिम फेरीमध्ये एकूण 251 गुण नोंदवले. तिच्या वर्चस्वापुढे चीनच्या वांग लुयाओ 205.8 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीनची जु होंग 229.4 गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर राहिली.

अपूर्वी आणि वांग यांच्यादरम्यानची लढत खूप चुरशीची ठरली. त्यात भारतीय खेळाडू फक्त 0.1 गुणाने आघाडीवर होती. अपूर्वीने अखेरीस 10.4 गुणांसह सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले, तर वांग फक्त 10.3 गुणच मिळवू शकली. अपूर्वी हिचे वर्षातील हे दुसरे आयएसएसएफ विश्वचषकातील सुवर्णपदक ठरले. याआधी तिने फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली येथे विश्व विक्रम रचताना पहिले स्थान पटकावले होते. बीजिंगमध्ये दुसजया विश्वचषकात ती चौथ्या स्थानावर होती. अपूर्वी हिचे कारकीर्दीतील हे चौथे आयएसएसएफ पदक आहे.

एक अन्य भारतीय इलावेनिल वलारिवान फायनलपर्यंत पोहोचली; परंतु ती दुर्दैवाने पदकापासून वंचित राहताना चौथ्या स्थानावर राहिली. ती कांस्यपदक जिंकणार्‍या खेळाडूच्या तुलनेत फक्त 0.1 गुणाने पिछाडीवर राहिली. पात्रता फेरीमध्ये अपूर्वी आणि इलावेनिल यांनी अंतिम फेरीत आगेकूच ठरली. अंतिम फेरीमध्ये अंजूम मोदगील 11 व्या, मनू भाकर 24 व्या आणि चिंकी यादव 95 व्या स्थानावर राहिली. या स्पर्धेतून रोमानियाच्या लॉरा जार्जेटा कोमान व हंगेरीच्या इस्टर मेसजारोस यांनी 2020 ऑलिम्पिक कोटा मिळवला. लॉरा व इस्टर यांनी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान पटकावले. याआधीच भारताकडून अपूर्वी चंदेला, सौरभ तिवारी, अभिषेक वर्मा, दिव्यांशसिंग पवार यांनी ऑलिम्पिक कोटा मिळवला. सोमवारी तीन अंतिम फेर्‍या होतील. यात सहा ऑलिम्पिक कोटा असेल.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply