Breaking News

उदे गं अंबे उदे

दीड-पावणेदोन वर्षांनंतर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे आणि देवळांची कवाडे एकदाची खुली झाल्यामुळे भाविकांनी मनातल्या मनात का होईना सुटकेचा निःश्वास सोडला असेल आणि मनोभावे हात जोडले असतील. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने घाईघाईने मद्याची दुकाने उघडण्यास परवानगी दिली. यथावकाश मद्यालये आणि उपाहारगृहे देखील सुरू झाली. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी हे आवश्यकच होते, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. कोरोनाचे निर्बंध पाळून मंदिरे का उघडत नाही, असा सवाल भारतीय जनता पक्षाने सरकारला केला. त्याचे उत्तर मात्र ठाकरे सरकारकडे नव्हते.

कोरोना विषाणूच्या थैमानामुळे प्रदीर्घ काळ सर्वांनाच घरात अडकून पडावे लागले. दुर्दैवाचा फेरा सगळ्यांच्याच नशिबी एकाच वेळी आला. या कोरोनाच्या साथीमध्ये कित्येकांनी आपले आप्तेष्ट गमावले. कित्येकांचे रोजगार बंद झाले. लाखो कुटुंब देशोधडीला लागली. कोरोनाविरुध्दची लढाई दीर्घकाळ चालणार असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी सुरुवातीलाच दिला होता. भारतीय नागरिकांनी इतिहासात पहिल्यांदाच देशव्यापी कठोर लॉकडाऊन अनुभवला अन् तोही थोडाथोडका नव्हे तर तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळ लांबलेला. त्या टाळेबंदीनंतर पहिल्यांदाच गुरुवारी राज्यातील मंदिरांची कवाडे पुन:श्च उघडली. गावागावांतील देवळांमधून पहाटेच्या समयी जो घंटानाद झाला, त्याने सारे समाजजीवन झंकारून उठले असेल. काकड आरतीच्या सुरांनी आसमंत गहिरा होऊन गेला असेल. त्या आरतीच्या सुरात आणि घंटानादात उगवतीचे रंग वेगळेच दिसू लागलेले अनेकांनी अनुभवले असेल. संकटाच्या काळात संकटमोचक ईश्वरच गाभार्‍यात बंदिस्त आहे ही कल्पनाच भाविकांना सहन होत नव्हती. अर्थात, हे स्वाभाविकच म्हणावे लागेल. मंदिरे आणि देवस्थाने यांचे देखील एक अर्थशास्त्र असते. अक्षरश: लाखो कुटुंब देवस्थानांच्या व्यवहारांवर अवलंबून असतात, आपापली पोटे भरत असतात. मंदिरे उघडण्यासाठी भाजपने, तसेच वंचित आघाडीने काही महिन्यांपूर्वी उग्र आंदोलने केली होती हे अनेकांना आठवत असेल. विरोधी पक्षाच्या आग्रहाच्या रेट्याला अखेर यश आले आणि ठाकरे सरकारला मंदिरे उघडण्यावाचून पर्याय उरला नाही. मंदिरे उघडताक्षणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवदर्शनाची प्रचंड आस लागल्याप्रमाणे भल्या सकाळी नजीकची देवळे गाठून देवदर्शनाचा लाभ घेतला. आपल्या नाकर्तेपणापायी ही देवळे इतके महिने बंद होती याची जाणीव होऊन त्यांनी देवापुढे नाक घासायला हवे होते. मंदिरांतील गर्दीमुळे कोरोना वाढतो हा आघाडी सरकारचा लाडका सिद्धांत आहे. तथापि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करवून देवस्थाने उघडून टाकल्यामुळे काहीच बिघडणार नव्हते. तसे ते बिघडायचे असते, तर दुकाने आणि मॉल उघडल्यानंतर कोरोना पसरला असता किंवा गणेशोत्सवानंतर तिसरी लाट येऊन ठेपली असती. सुदैवाने तसे काही घडले नाही. विघ्नहर्त्या गणेशाने कोरोनाचे संकट पिटाळून लावले असेच म्हणावे लागेल. कोरोनाचा धोका सध्या कमी झालेला असला, तरी सुजाण नागरिक म्हणून काही पथ्ये आपल्याला पाळावीच लागतील. कोरोनाचे उच्चाटन झाले असे समजून देवदर्शनासाठी देवालयांमध्ये झुंबड करण्यात काहीच शहाणपणा नाही. अजून काही काळ तरी काळजी घेतलीच पाहिजे असे वाटते. नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दिवशीच देवस्थाने आणि मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी खुले झाले आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे. याचे मनोभावे आणि मन:पूर्वक स्वागत करायला हवे.

Check Also

‘नैना’संदर्भात तातडीने बैठक घ्या

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त नैना प्राधिकरणाच्या …

Leave a Reply