Breaking News

नवीन पनवेलमध्ये वंदे मातरम् गीताचे भव्य समूह गायन

देशाभिमान आणि एकतेचा अविस्मरणीय अनुभव; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
थोर तत्वज्ञ व कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम् हे गीत लिहिले त्याला 150 वर्षे पूर्ण झाली. ’वंदे मातरम्’ असे शब्द उच्चारताच प्रत्येक भारतीयाच्या रोमा-रोमात देशभक्तीचा संचार होतो. अशा या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या गीताचा गजर शुक्रवारी (दि. 7) देशभर घुमत असताना पनवेलमध्येही भव्य स्वरूपात त्याचे समूह गायन झाले. नवीन पनवेलमधील बांठिया विद्यालयाच्या मैदानावर झालेला हा राष्ट्रप्रेमी उत्सव मातृभूमीप्रती अभिमान आणि देशभक्तीची भावना जागवणारा अविस्मरणीय अनुभव ठरला.
महाराष्ट्र प्रदेश आणि उत्तर रायगड भाजपच्या वतीने हा वंदे मातरम समूह गायन विशेष कार्यक्रम राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अभिनेते व राष्ट्रविचाराचे प्रसिद्ध व्याख्याते शरद पोंक्षे यांचे प्रमुख वक्ते म्हणून वंदे मातरम् गीताची पार्श्वभूमी व महत्त्व यावर मार्गदर्शन झाले. या वेळी या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, ज्येष्ठ नेते वसंत भोईर, श्रीनंद पटवर्धन, सुनील घरत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, उपाध्यक्ष गणेश कडू, माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, जयंत पगडे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, ब्रिजेश पटेल, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, मनोहर म्हात्रे, बबन मुकादम, रवींद्र भगत, तेजस कांडपिळे, नरेश ठाकूर, समीर ठाकूर, सुनील बहिरा, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका सुशीला घरत, राजेश्री वावेकर, प्रिती जॉर्ज, वृषाली वाघमारे, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, जिल्हा सदस्य जितेंद्र म्हात्रे, अ‍ॅड. चेतन जाधव, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, युवा मोर्चाचे नवीन पनवेल अध्यक्ष मयूर कदम, पनवेल अध्यक्ष हिमेश बहिरा, रोहित जगताप यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
स्वातंत्र्यलढ्यात कितीतरी सत्याग्रहींनी ब्रिटिश साम्राज्याची श्रृंखला तोडण्यासाठी कारागृहाचा मार्ग पत्करला. काळ्या पाण्याची शिक्षा अनुभवली, अनेकजण त्या वेदीवर हुतात्माही झाले. या सार्‍यांच्या मागे प्रेरणा होती ती वंदे मातरम् या तेजस्वी मंत्राची. या गीताची महती कितीही वर्षे उलटली, तरी ती सदैव प्रत्येक भारतीयाच्या कानात घुमत आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रीय महासभेच्या अधिवेशनात 1896मध्ये प्रथम वंदे मातरम् ही रचना गायली होती. राष्ट्रीय महासभेने त्याच वर्षी हे गीत, त्यातील पहिली दोन कडवी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आणि अनुसरले. या गीतावर आधारित एक सुंदर चित्रांकन प्रकाशित झाले होते. त्यातील समर्पकता आणि अर्थपूर्णता विहंगम आणि तेवढीच प्रेरक आहे.
प्रत्येक पिढीला देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा वंदे मातरम्चा अमर मंत्र आजही तेवढ्याच तेजाने घुमतो आहे. राष्ट्रभक्तीची ही ज्योत अखंडपणे प्रज्वलित ठेवणे खरी श्रद्धांजली सर्व शहीदांना आणि सेनानींना आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने विविध विद्यालयांतील तीन हजारहून अधिक विद्यार्थी, विविध संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मातृभूमीबद्दलचा अभिमान अधिक वृद्धिंगत व्हावा आणि वंदे मातरम् गीताची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहचावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. देशभक्तीचे हे वातावरण बघून प्रभावित झालो आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांना समाजातील सुख दुखाची जाण आहे त्यामुळे ते अशी समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात.
-गणेश नाईक, वनमंत्री, महाराष्ट्र


‘वंदे मातरम्’चा कुठल्याही धर्माशी संबंध नाही, तर हे गीत ही आपल्या मातृभूमीला पृथ्वीमातेप्रती अर्पण केलेली आदरांजली आहे. या गीतात आपल्या देशाबद्दलची अपार श्रद्धा, प्रेम आणि अभिमान व्यक्त झाला आहे. भारतभूमीचा इतिहास अलौकिक आहे, संस्कृती अद्वितीय आहे आणि जगाच्या पाठीवर तिच्यासारखी दुसरी भूमी नाही. त्यामुळे वंदे मातरम्चा खरा अर्थ प्रत्येक भारतीयाने समजून घेतला पाहिजे. हे केवळ गीत नाही, तर आपल्या राष्ट्रभावनेचे, एकात्मतेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे.
-शरद पोंक्षे, अभिनेते व राष्ट्रविचाराचे प्रसिद्ध व्याख्याते

वंदे मातरम् हे गीत सर्वांच्या अस्मितेचे प्रतीक असून ते भारतीय संस्कृतीचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. आज या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली. हे गीत भारतभूमीला दिलेला ठेवा आहे. केंद्र व राज्य सरकारने हे कार्यक्रम करत असताना भाजपनेही त्याच अनुषंगाने व्यापक स्वरूपात कार्यक्रम आयोजित केले आहेत. भारतभूमीबद्दल सर्वांना अभिमान आहे. त्यामुळे वंदे मातरम गीत जनमनापर्यंत आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचले पाहिजे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात विद्यार्थी, संस्था, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.
-आमदार प्रशांत ठाकूर, कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply