अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर येथे एकता क्रीडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय हनुमान चरी संघाने विजेतेपद पटकाविले; तर श्री हनुमान स्पोर्ट्स चरी संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेला सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. त्यांचे आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील 32 संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन सावकार डेव्हलपर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे चेअरमन लवेरा भगत यांच्या हस्ते झाले. या समारंभास मॅनेजिंग डायरेक्टर निशांत भगत, एकता क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व माजी अध्यक्ष अमर भोईर यांच्यासह सदस्य व खेळाडू उपस्थित होते.
स्पर्धेत तृतीय क्रमांक म्हसोबा संघ पेझारीने आणि चतुर्थ क्रमांक म्हसोबा युवक संघ धाकटे शहापूर या संघाने प्राप्त केला. सर्वोत्कृष्ट खेळाडू राहुल भोईर, उत्कृष्ट चढाईपटू अक्षय पाटील, पकडपटू विराज पाटील यांची निवड करण्यात आली.
या स्पर्धेस जि. प. उपाध्यक्ष व महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील, युवा नेते सवाई पाटील, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध मच्छीमार संस्थेचे चेअरमन व सदस्य, तसेच मानसी इंटरप्रायझेसचे महेश झिंग आणि धेरंड शहापूर, मोठे शहापूर व पंचक्रोशीतील कबड्डीप्रेमी रसिकांनी उपस्थिती दर्शविली.
जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा स्पर्धेदरम्यान सन्मान करण्यात आला.