अॅड. मनोज भुजबळ यांची मागणी
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात ठरवून दिलेल्या वारानुसार सकाळी 7 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान दुकाने उघडण्यात येत असल्याने नागारिकांना एकाचवेळी सगळ्या वस्तू खरेदी करता येत नाहीत. त्यासाठी दररोज बाहेर पडावे लागत असल्याने बाजारात मोठी गर्दी होते. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून महापालिका क्षेत्रात सर्व दुकाने रोज ठराविक वेळेत उघडी ठेवावी, अशी मागणी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे
केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत किराणा, दूध, बेकरी उत्पादने यांच्याबरोबरच इतर दुकानेही सुरू करावीत, अशी मागणी भाजपने आयुक्तांकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत महापालिकेने ठरवून दिलेल्या वारानुसार सकाळी 7 ते संध्याकाळी 5 च्या दरम्यान ही दुकाने उघडण्याची परवानगी दिली होती. शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे; अन्यथा आढावा घेऊन दोनच दिवसांत निर्णय मागे घेतला जाईल, असा इशारा तत्कालीन आयुक्तांनी दिला होता. पनवेलमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेताना प्रत्येक प्रकारच्या दुकानांसाठी वेगवेगळे वार ठरवून दिले आहेत. मान्सूनपूर्व अनेक कामे लॉकडाऊनमुळे रखडल्याने नागरिकांना ही कामे पूर्ण करून घेण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू घ्याव्या लागतात. त्या प्रत्येक वस्तूच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दिवशी बाजारात आल्याने तेथे गर्दी होते. त्यामुळे नियमांचे पालन होताना दिसत नाही. सर्व दुकाने रोज ठराविक वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिल्यास नागरिकांना रोज बाजारात यावे लागणार नाही. तेथे गर्दी कमी होईल त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो यासाठी
सर्व दुकाने रोज सुरू ठेवण्याची मागणी अॅड. मनोज भुजबळ यांनी महापौर आणि आयुक्तांकडे केली आहे.