गाड्या धुण्यासाठी वाहत्या पाण्यात
कर्जत : बातमीदार : टाटा पॉवर हाऊसमधून सोडण्यात येणारे पाणी उल्हास नदीतून कल्याणच्या खाडीपर्यत वाहत जाते, ते पिण्यासाठी राखीव असल्याने या नदीच्या पाण्यावर काही शहरे आणि शेकडो गावांची तहान भागविली जाते. मात्र या नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले असून, जलपर्णी पाठोपाठ आता या नदी पात्रात गाड्या घुतल्या जात आहेत. गाडीचे ऑइल पाण्यात वाहून जात असल्याने नदीचे प्रदूषण वाढत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी अशी महानगरे आणि अंबरनाथ, बदलापूर अशी शहरे तसेच ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील अनेक लहान गावांना उल्हास नदी पिण्याचे पाणी देते. त्यामुळे या नदीच्या परिसरात शासनाने एमआयडीसीला परवानगी दिलेली नाही. मात्र आता सांडपाणीच या नदीचे पाणी दूषित करीत आहे. त्यातच उल्हास नदीला मागील दोन वर्षांपासून जलपर्णी यांचा विळखा पडला आहे. उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शासन स्तरावर काही उपाययोजना होताना दिसत आहेत. दुसरीकडे नेरळ दहिवली पुलाजवळ याच नदी पात्रात वाहनचालक गाड्या धुण्याची कामे करीत आहेत. त्यात गाडीचे ऑइल नदीच्या पाण्यात मिसळून जात आहे. त्यामुळे उल्हास नदीचे पाणी आणखी प्रदूषित होताना दिसत आहेत.
वाहने धुण्याचे काम करणार्या वाहन चालकांना चाप बसावा यासाठी दहिवली ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी बंदी घातली होती. वाहनांना नदीपात्रात जाता येऊ नये आणि नदीचे पाणी दूषित होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने तेथील गणेशघाटाला लागून मातीचा भराव केला आहे. तरीदेखील वाहन चालक आपल्या गाड्या नदीच्या पाण्यात नेत आहेत. त्यामुळे आता दहिवली ग्रामपंचायतीने नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे निश्चित केले आहे.