फसवणूक करणार्या कर्मचार्यांचे निलंबन
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
नोटाबंदीनंतर पेटीएम ही कंपनी चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पेटीएम कंपनी चर्चेत आली आहे. कॅशबॅकच्या माध्यमातून पेटीएमममध्ये 10 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. खुद्द कंपनीचे प्रमुख विजय शेखर शर्मा यांनी याबाबत माहिती दिली.
पेटीएममध्ये हा फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर या फसवणुकीशी संबंधित असलेल्या कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त या फसवणुकीमध्ये सहभागी असलेल्या विक्रेत्यांनाही कंपनीच्या यादीतून काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. कॅशबॅकच्या नावावर कंपनीमध्ये 10 कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली. दिवाळीनंतर कॅशबॅकच्या नावाखाली मोठी रक्कम वळती होत असल्याची माहिती मिळाल्याचे शर्मा यांनी सांगितले. यावरून कंपनीला संशय आल्यानंतर कंपनीने लेखापरीक्षण सुरू केल्याचे ते म्हणाले. लेखापरीक्षणात कंपनीच्या काही कर्मचार्यांनी कॅशबॅकच्या नावावर ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम दिल्याचे समोर आले, तसेच गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचेही त्यांनी सांगितले.
कंपनीने या प्रकारानंतर या फसवणुकीत सहभागी असलेल्या अनेक कर्मचार्यांचे निलंबन केले आहे, तसेच यातील विक्रेत्यांवरही कारवाई सुरू केल्याचे शर्मा यांनी सांगितले. नव्या विक्रेत्यांना कंपनीशी जोडण्याचे काम सुरू असून यापुढे ब्रॅण्डेड विक्रेत्यांनाच सोबत घेण्याचे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, पेटीएमसारखा प्लॅटफॉर्म प्रोसेसिंग ट्रान्झॅक्शनसाठी देण्यात आलेल्या मर्चंट डिस्काऊंड रेटच्या माध्यमातून नफा मिळवत असतो, तसेच चित्रपटांच्या तिकिटांची विक्री केल्यानंतर त्यातून 15 टक्के रक्कम मिळते. त्यातूनच कॅशबॅकसारख्या सुविधा देण्यास मदत मिळत असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पेटीएमने मंगळवारीच नवे क्रेडिट कार्ड लॉन्च केले. यासाठी कंपनीने सिटी बँकेसोबत हातमिळवणी केली असून या क्रेडिट कार्डचा वापर करणार्या ग्राहकांना एक टक्का युनिव्हर्सल अनलिमिटेड कॅशबॅक देण्यात येणार आहे, तसेच या कार्डवरून करण्यात आलेल्या ट्रान्झॅक्शननंतर मिळणार्या रिवॉर्ड पॉइंटना कोणत्याही अटी लागू नसतील, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. या क्रेडिट कार्डला पेटीएम फर्स्ट कार्ड असे नाव देण्यात आले आहे. यासाठी कंपनी वार्षिक 500 रुपये शुल्क आकारणार आहे. वर्षाला एखाद्या ग्राहकाने या कार्डच्या माध्यमातून 50 हजार रुपयांची खरेदी केल्यास त्याला हे शुल्क भरावे लागणार नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.