Breaking News

मेरिटाईम बोर्डाच्या मालमत्तेला मोरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उरण : प्रतिनिधी

मोरा-मुंबई जलमार्गावरील मोरा धक्क्यावर मोटारसायकली घेऊन जाण्यास बंदी असतानाही प्रवाशी बिनधास्त मोटारसायकली घेऊन जात आहेत. त्यावर बंदी घालण्यासाठी मोरा बंदराच्या प्रवेशद्वाराला मोरा पोलिसांनी बेडी लावून बंदराचे प्रवेशद्वार बंद केले आहे. सदरचे काम मेरिटाईम बोर्डचे असतानाही हे काम पोलिसांना करावे लागत असल्याने ते नियमाला धरून नसल्याने प्रवासी वर्गातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मोरा बंदराला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यामध्ये पिण्याचे पाणी, बंद शौचालये, तसेच धक्क्यावरील ग्रीलवर टाकण्यात आलेली जाळी, प्रवासी धक्क्यावरच मासळी मार्केट आणि मासे साफ करण्याच्या प्रक्रियेचा त्रास प्रवासी वर्गाला जाणवत असतानाही मोटारसायकली धक्क्यावरून नेण्यास बंदी घालण्यात आली, मात्र ही बंदी मेरीटाईम बोर्डाने घातली की मोरा सागरी पोलीस ठाण्याने घातली हा आदेश नेमका कोणाचा? याबाबत मोरा-मुंबई जलमार्ग प्रवासी वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकाराने प्रवासी वर्गात मात्र होणार्‍या अन्यायाविरोधात चर्चेला उधाण आले आहे.

मोटारसायकली नेण्यास बंदी घालत बंदराच्या प्रवेशद्वाराला असलेल्या गेटला कुलूप लावण्यात आले होते, मात्र ते दोन-तीन वेळा तोडण्यात आले होते. त्यावर नियंत्रण ठेवणे मेरिटाईम बोर्डाची जबाबदारी असतानाही मोरा सागरी पोलिसांनी याची दखल घेत धक्क्याच्या प्रवेशद्वाराला पोलिसांनी चक्क आरोपी पकडण्यासाठी वापरण्यात येणार्‍या बेड्याच लावून प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक पोलीस हवालदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

जर पुन्हा प्रवेशद्वाराच्या बेड्या अज्ञातांनी तोडून पळविल्या तर पुढे काय, अशी विचारणा बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना आमच्या प्रतिनिधीनी केली असता गुन्हा दाखल करू, अशी माहिती तेथील बंदोबस्तास उपस्थित असलेल्या पोलिसांनी दिली, मात्र मोरा बंदराच्या प्रवेशद्वारातून मोटारगाड्या नेण्यास बंदी घालून प्रवेशद्वाराला आरोपी बनवून पोलिसानी चक्क बेड्या ठोकल्याने उरणात चर्चेला उधाण आले आहे. बेड्या ठोकण्याच्या संदर्भात अथवा घालण्याच्या संदर्भात नेमका कायदा कोणता हे पोलिसांना तरी ठाऊक आहे का?

त्याचबरोबर अशा प्रकारे प्रवेशद्वाराला बेड्या लावण्याचा अधिकार आहे का? असाही सवाल नागरिकांनी या निमित्ताने उपस्थित केला असून यासंदर्भात प्रवेशद्वाराला बेड्या ठोकण्यापूर्वी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांची प्रवेशद्वाराला बेड्या ठोकण्यापूर्वी सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी पूर्वपरवानगी घेतली होती का? त्याचप्रमाणे मेरीटाईम बोर्डाच्या मालमत्तेला पोलिसांनी कशा काय बेड्या ठोकल्या याबद्दल उरणच्या नाक्या नाक्यावर मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले असून, या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क होऊ शकला नाही.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोरा पोलीसांनी मोटारसायकल पार्किंग काढून मोरा जलमार्गाचे प्रवेशद्वार बंद केले असून प्रवेशद्वाराला साखळीने  टाळा लावला होता, मात्र तो तोडल्याने बेड्या लावून टाळा लावला आहे.

-बी. बी. पवार, मेरिटाईम बोर्ड

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply