Breaking News

टी-20त पुजाराचे जलद शतक

इंदूर : वृत्तसंस्था

इंडियन प्रीमिअर लीगसाठी झालेल्या लिलाव प्रक्रियेत संघ मालकांनी नाकारलेल्या चेतेश्वर पुजाराने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत खणखणीत शतक ठोकले. कसोटीपटू असा स्टॅम पाठीशी लागल्यामुळे पुजाराला एकाही आयपीएल संघाने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले नाही, पण त्याने गुरुवारी (दि. 21) 61 चेंडूंत नाबाद 100 धावा चोपून आयपीएल मालकांना जणू चपराकच दिली. सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना पुजाराने रेल्वेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

पुजाराला आयपीएलमध्ये 30 सामन्यांत 20.52च्या सरासरीने 390 धावा करता आल्या होत्या. त्यात 51 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती, पण 2014नंतर त्याला आयपीएलपासून दूर ठेवण्याचाच पवित्रा संघ मालकांनी घेतला. त्यामुळे पुजारा या झटपट क्रिकेट फॉरमॅटपासून दुरावला होता. त्याने सर्व लक्ष कसोटीकडे केंद्रित करताना भारतीय संघासाठी बहुमूल्य योगदान दिले. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात पुजाराची बॅट चांगलीच तळपली होती. इंग्लंड दौर्‍यातही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती, परंतु रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो अपयशी ठरला आणि विदर्भने जेतेपदाला गवसणी घातली.

सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतील ‘क’ गटाच्या पहिल्याच सामन्यात पुजाराने जोरदार फटकेबाजी केली. रेल्वेने नाणेफेक जिंकून सौराष्ट्रला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. हार्विक देसाई आणि पुजारा यांनी पहिल्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. देसाई बाद झाल्यानंतर पुजारा व रॉबीन उथप्पा यांनी रेल्वेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 82 धावा जोडल्या. उथप्पाने 31 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 46 धावा केल्या. पुजाराने एका बाजूने फटकेबाजी सुरू ठेवताना 1 षटकार व 14 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर सौराष्ट्रने 3 बाद 188 धावांचा डोंगर उभा केला.

वीरू, रोहितशी बरोबरी पुजाराने यासह आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 300+, लिस्ट-क्रिकेटमध्ये 150+ आणि ट्वेन्टी-20त 100+ धावा अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय ठरला आहे. याआधी वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल यांनी ही कामगिरी केली आहे, पण भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 300+, लिस्ट-क्रिकेटमध्ये 150+ आणि टी-20त 100+ धावा अशी कामगिरी करणारा पुजारा हा अग्रवालनंतर पहिलाच खेळाडू ठरला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply