अलिबाग : प्रतिनिधी
पालकमंत्र्यांच्या आदेशाची तातडीने पूर्तता करावी व शेतकर्याची फसवणूक करणार्यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी. बाधीत शेतकर्यांना नुकसान भरपाईतील वाढीव मोबदला देण्यात यावा. मागणीसाठी पेण आणि खालापूर तालुक्यातील रिलायन्स प्रकल्प बाधीत शेतकर्यांनी बुधवार (20 फेब्रुवारी) पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. यानंतरही जिल्हाधिकारी, कंपनी प्रशासनाने दखल घेतली नाही तर 25 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा या शेतकर्यांनी दिला आहे. नागोठणे ते गुजरातमधील दहेजपर्यंत गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. रिलायन्स कंपनीने ही गॅस पाईप लाईन टाकली आहे. यात ज्या शेतकर्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत, त्यांना रिलायन्स कंपनीने नुकसान भरपाई दिली आहे. मात्र या नुकसान भरपाईत तफावत आहे. समान क्षेत्र असले तरी नुकसान भरपाई वेगवेगळी देण्यात आली आहे.
पेण तालुक्यातील निगडे, आयटेम, मुंढाणी, झोतीरपाडा आदी ठिकाणी प्रतिगुंठा 2 लाख 80 हजार ते 7 लाख अशी नुकसान भरपाई देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वाना समान नुकसान भरपाई मिळावी.
ज्यांना कमी मोबदला दिला गेला आहे, तो वाढवून मिळावा अशी मागणी शेतकर्यांची आहे. यासाठी 2016 पासून हे शेतकरी पाठपुरावा करीत आहेत.
21 डिसेंबर 2018 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधीतांची एक बैठक घेऊन कमी मोबदला मिळालेल्या शेतकर्यांच्या नुकसानीचा पुन्हा पंधरा दिवसात पंचनामा करण्याचे आदेश दिले होते.
मात्र दोन महिने उलटूनही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या शेतकर्यांनी 20 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा बेमुदत साखळी सुरु केले आहे.