
खोपोली ः प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात आणि राज्यात अनेक रुग्ण आढळत असले तरी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. कारण हा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असून महाराजांचे मावळे कोरोनासारख्या विषाणूंना घाबरणारे नसून त्याच्या विरोधात लढणारे आहेत, मात्र यादरम्यान नागरिकांनी घरात राहून कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यात आढावा दौर्यासाठी खालापुरात आल्या होत्या. या वेळी खोपोली शहरातील जनता विद्यालयात नागरिकांना राहण्यासाठी केलेली व्यवस्था त्यांनी पाहिली. त्यानंतर खालापूर तालुक्यातील प्रशासनाने कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी कोणती यंत्रणा उभारली आहे याची पाहणी त्यांनी केली. या वेळी प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार इरेश चप्पलवार, खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, मुख्याधिकारी गणेश शेटे, खालापूर वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार शहा, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. बी. रोकडे, खालापूर नगरपंचायत उपनगराध्यक्षा शिवानी जंगम, मुख्याधिकारी, खोपोली पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता वानखेडे, ग्रामविकास अधिकारी अनिल भोये यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. कोरोनाचा आपल्या तालुक्यात शिरकाव होऊ नये यासाठी खालापूर तालुका तहसील, खोपोली नगरपालिका प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा उत्तम काम करीत असल्याचे पाहून जिल्हाधिकारी चौधरी यांनी समाधान व्यक्त केले. प्रशासन अधिकार्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, कोरोनाचे संकट हे आपल्या देशावरच नव्हे तर आपल्या घरावर पडलेले संकट आहे या भावनेतून काम करा. देशाचे भवितव्य आपल्यावर अवलंबून आहे, असे सांगत सर्वांनी फक्त लॉकडाऊनपर्यंत रात्रंदिवस मेहनत करा. शेवटी विजय आपलाच असल्याचा विश्वास देत लॉकडाऊनदरम्यान अनेक परप्रांतीय नागरिक पायी गावी चालत निघाले आहेत. ते आपलेच आहेत या भावनेतून मदत करण्याचे अवाहनही शेवटी त्यांनी केले. जिल्हाधिकार्यांनी तालुक्यातील कोरोनाविरोधात लढण्यासाठीची यंत्रणा पाहून सर्वांचे कौतुक केल्याची माहिती तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी दिली.