पनवेल : प्रतिनिधी : पनवेल आरटीओ कार्यालयात असलेले ज्ञानदेव देवखिळे 31 मे रोजी निवृत्त झाले. त्यांना कार्यालयातर्फे निरोप देताना त्यांच्या सहकार्यांनी खेड्यात कोणतीही शिक्षणाची सोय नसताना सैन्यात जाऊन आपली शिक्षणाची आवड पूर्ण करणार्या ज्ञानदेव देवखिळे यांची सिंघम म्हणून ओळख असल्याचे सांगून त्यांचे नेहमीच अडचणीच्या वेळी आपल्याला मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.
ज्ञानदेव देवखिळे हे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील करजगाव येथील मूळ रहिवासी असून त्यांनी सैन्यदलात साधे सैनिक म्हणून कारकीर्द सुरू केली. नंतर परीक्षा देऊन मिलिटरी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. त्यांनी चीन, पाकिस्तान आणि ब्रह्मदेशाच्या सीमेवर काम केले. 1984 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या कारवाईत (ऑपरेशन ब्ल्यू स्टार) मध्येही ते सहभागी होते. श्रीलंकेत लिट्टे दहशतवादाविरुद्ध गेलेल्या भारतीय सैन्याच्या तुकडीतही ते होते. 31 जुलै 1997 रोजी 18 वर्षानंतर ते सैन्यदलातून निवृत्त झाले. त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पाच सेवापदके मिळाली आहेत. याशिवाय सैन्यदलात मानाच्या समजल्या जाणार्या आर्मी परेडमध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला होता. सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एमपीएससी परीक्षा देऊन प्रादेशिक परिवहन खात्यात प्रवेश केला. 20 वर्षाच्या सेवेत त्यांनी ठाणे, जळगाव, सातारा, बारामती आणि पनवेल येथे काम केले.
शुक्रवारी पनवेल कार्यालयात त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाला प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी, वाहन निरीक्षक गजानन ठोंबरे, निरीक्षक विवेक देवखिळे, धनराज शिंदे, सचिन पाटील, आनंदराव वागळे, सूर्यकांत गंभीर, शशिकांत तिरसे, राहुल गावडे यांच्यासह इतर सहकारी, पत्नी, मुले, सुना, भाऊ आणि मित्र परिवार उपस्थित होता. या वेळी त्यांना सर्वांनी ‘शूरा मी वंदिले’ म्हणून निरोप दिला.