उरण : बातमीदार : 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन. या दिवशी संपूर्ण जगात तंबाखू विरोधात जनजागृती करण्यात येते. यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील वशेणी गावात ‘जागर तंबाखू मुक्तीचा’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रधार मच्छिंद्र म्हात्रे यांनी उपस्थित नागरिकांना तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखू विरोधी कायदे, तंबाखूमधील विषारी घटक याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे तंबाखूमुक्त शाळा व समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपले कुटुंब तंबाखूमुक्त ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी वशेणी गावचे सरपंच जीवन गावंड, ग्रामपंचायत सदस्य गणपत ठाकूर, पोलीस मित्र मुकेश म्हात्रे, साहित्यिक किशोर म्हात्रे, सतीश पाटील, बळीराम म्हात्रे, विठोबा पाटील, नागेश म्हात्रे, समर्थ चषक समूहाचे संचालक भार्गव ठाकूर, हरेश्वर पाटील, सौदागर गावंड, राजेंद्र तांडेल, अंकुश ठाकूर, गोपाळ म्हात्रे, विरूभाई स्वीटवाला आदी उपस्थित होते. या वेळी तंबाखूचे दुष्परिणाम सांगणारी माहितीपत्रके वाटण्यात आली. दिवसभरात वशेणी बसस्टॉपवर येणार्या-जाणार्या दोनशेहून अधिक प्रवाशांना, वाहनचालकांना अशी जनजागृतीपर पत्रके वाटण्यात आली.