Breaking News

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी

डॉ. शिरोडकर, अनिकेत, महात्मा गांधी यांनी महिलांमध्ये; तर देना बँक, महिंद्रा यांनी पुरुषांमध्ये शिवनेरी मंडळ आयोजित स्व. मोहन नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. दादर शिंदेवाडी येथील भवानीमाता क्रीडांगणावर बुधवारी (दि. 20) झालेल्या महिलांच्या उद्घाटनीय सामन्यात डॉ. शिरोडकरने चुरशीच्या लढतीत 41-33 अशी मात करीत ‘क’ गटात पहिल्या साखळी विजयाची नोंद केली.

मध्यांतराला 23-21 अशी आघाडी घेणार्‍या शिरोडकरला अमर हिंदने विजयासाठी चांगलेच झुंजविले. शेवटी आठ गुणांनी शिरोडकर विजयी ठरले. शिरोडकरकडून क्षितिजा हिरवे, मेघा कदम; तर अमर हिंदकडून श्रद्धा कदम, तेजश्री सारंग उत्कृष्ट खेळले.

महिलांच्या ‘ड’ गटात रत्नागिरीच्या अनिकेत मंडळाने पालघरच्या श्रीराम संघाला 35-16 असे सहज नमविले. मध्यांतराला 17-04 अशी भक्कम आघाडी घेणार्‍या अनिकेतने नंतर आपल्या राखीव खेळाडूंना संधी दिली. सिद्धी चाळके, तसमीन बुरोंडकर यांच्या चढाया त्याला रोहिणी बैकर, सोनाली राठोड यांची पकडीची मिळालेली भक्कम साथ यामुळे हा विजय सोपा गेला. श्रीरामाच्या ऐश्वर्या काळे, संगीता भारद्वाज बर्‍या खेळल्या. ‘ब’ गटात उपनगरच्या महात्मा गांधीने उपनगरच्या महात्मा फुलेंचा 39-17 असा धुव्वा उडविला. सृष्टी चाळके, सायली जाधव, तृप्ती सोनावणे यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

पुरुषांच्या उद्घाटनीय सामन्यात देना बँकेने बँक ऑफ महाराष्ट्राला 49-02 अशी धूळ चारली. एकेकाळचा दादा समजला जाणारा हा महाराष्ट्र बँकेचा संघ आज अगदीच दीनदुबळा वाटला. 5 लोण सलग दिल्यावर म्हणजे 45 गुण गमविल्यावर महाबँकेला पहिला गुण मिळविता आला. मध्यांतराला 32-00 असा देना बँकेच्या बाजूने गुणफलक होता. सिद्धार्थ बोरकर, सागर सुर्वे यांच्या झंजावाती खेळाला देना बँकेच्या या मोठ्या विजयाचे श्रेय जाते.

‘ब’ गटात महिंद्राने मध्य रेल्वे डिव्हिजनचा 33-22 असा पाडाव केला. पाचव्या मिनिटाला लोण देत महिंद्राने 9-1 अशी आघाडी घेतली. पुन्हा दुसरा लोण देत मध्यांतराला ही आघाडी 27-09 अशी वाढविली. मध्यांतरानंतर मात्र रेल्वेने थोडा प्रतिकार केला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. महिंद्राकडून आनंदा शिंदे, ओमकार जाधव; तर रेल्वेकडून पंकज चव्हाण, अभिजित पाटील उत्तम खेळले.

Check Also

एक दिग्दर्शक, एक वर्ष, चार चित्रपट, सर्वच सुपर हिट; मनमोहन देसाईंची कम्माल…

दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या चित्रपटात इतकं आवडण्यासारखे काय असते? माहीत नाही. याचा अर्थ त्याबाबत अज्ञान आहे …

Leave a Reply