Breaking News

शिवछत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज रायगड ; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला अभिषेकाचा मान ; चार देशांच्या राजदूतांची हजेरी

महाड ः प्रतिनिधी

रिमझिम पाऊस, मधूनच उठणारे धुके अशा आल्हाददायी वातावरणात किल्ले रायगडावर गुरुवारी (दि. 6) शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण देशभरातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगडावर एकच गर्दी केली होती. या वेळी शिवभक्तांच्या शिवगर्जनेने रायगड दुमदुमून गेला होता. राज्यात सुराज्य निर्माण व्हावे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना होती. शिवरायांच्या विचारांचा आदर्श घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव केवळ राजकीय फायद्यासाठी घेतले जाऊ नये, असे प्रतिपादन युवराज संभाजीराजे यांनी या वेळी केले.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीमार्फत गेली अनेक वर्षे किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. दरवर्षीपेक्षा यावर्षी किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती. किल्ले रायगडचा पायरी मार्ग, रायगड रोप वे शिवभक्तांच्या गर्दीने फुलले होते. देशभरातून आलेल्या शिवभक्तांच्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, हा एकच नारा दिला जात असल्याने संपूर्ण रायगडची पायवाट आणि रोप वे परिसर दुमदुमून गेला. जिकडे तिकडे हातात घेतलेल्या भगव्या पताका, फेटे बांधलेले शिवभक्त दिसून येत होते. पहाटेच या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. गडावर वाजणारे ढोलताशे, हलगीवर खेळले जाणारे मर्दानी खेळ, गोंधळ, शाहिरी पोवाड्यांनी संपूर्ण आसमंत निनादून गेला. शाहिरांच्या या पोवाड्यांना उपस्थित शिवभक्तांनीही दाद दिली. यामुळे गडावर शिवकाल अवतरल्याचा भास होत होता. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी वाजतगाजत राजसदर येथे आणण्यात आली. राजसदरेवर छत्रपती युवराज संभाजी राजे आणि त्यांचे पुत्र शहाजी राजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. कोल्हापूर हायकर्सच्या वतीने आणण्यात आलेल्या पंचजल कुंभातील पाणी आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. या वेळी समोरील शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांचा एकच जयघोष केला. विशेष म्हणजे या सोहळ्याला चीन, बल्गेरिया, पोलंड, ट्युनेशिया या चार देशांचे राजदूत

उपस्थित होते.

या वेळी राजसदरेवर रायगड जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, चार देशांचे राजदूत, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, राष्ट्रसेवा समूह संस्थेचे अध्यक्ष राहुल पोकळे, निवृत्त कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात छत्रपती युवराज संभाजी राजे यांनी ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला, त्या भूमीत त्यांचा वंशज म्हणून काम करताना अभिमान वाटतो. मी आज जो कोणी आहे तो केवळ या छत्रपती शिवरायांमुळे आणि या रायगडामुळे आहे, असे स्पष्ट करीत राज्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी अनेक वर्षांत उपाययोजना झाल्या नाहीत. या ठिकाणी संत्री, द्राक्ष आदी फळपिके मोठ्या प्रमाणात उत्पादित होत असली तरी ते आयात करावे लागते. हे दुर्दैव असून यापुढे शेतकर्‍यांसाठी काम करणार असल्याचेही युवराज संभाजी राजे यांनी स्पष्ट केले. रायगड संवर्धन हे आपले ध्येय असून पुढील दोन वर्षांत हातात घेतलेली कामे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रायगड रोप वे गेली दोन दिवस सतत सुरू आहे, मात्र शिवभक्तांची गर्दी पाहता त्यांचेही काहीच चालत नसल्याचे दिसून आले. कार्यक्रमाला आलेले मान्यवर, शासकीय अधिकारी यांना प्राधान्याने सोडणे आवश्यक असल्याने शिवभक्तांना किमान पाच ते सहा तासांची प्रतीक्षा करावी लागली. यामुळे अरुंद जागी गर्दी होऊन धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र ठिकठिकाणी पोलीस आणि गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात केल्याने शिवप्रेमींचा मार्ग सुकर बनला होता. सातत्याने कोंझर ते पाचाड यादरम्यान घाटमार्गावर अरुंद रस्ता आणि दोन्ही बाजूला लावली जाणारी वाहने यामुळे वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. यावर्षी मात्र यात बदल करण्यात आला होता. कोंझर या ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली आणि तेथून एसटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. कोंझर ते पाचाड हा घाटमार्ग यामुळे मोकळा राहिला आणि शिवप्रेमींना रायगडापर्यंत जाणे सुकर झाले. महाड एसटी आगाराने याकामी मोलाचे सहकार्य करीत महाड, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा आगारातील 65 बसेस कोंझर ते रायगड अशा प्रवासाकरिता उपलब्ध करून दिल्या. खा. उदयनराजे भोसले यांनीही रायगडावर छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेतले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply