रसायनी : प्रतिनिधी
चौक येथील श्री गुरू साखरे महाराज प्रासादिक श्रीनाथ आश्रम यांच्या वतीने श्री मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोमवारी (दि. 10) झाला. या सप्ताहात सोमवारी कीर्तन केसरी पुरस्काराने सन्मानित व महाराष्ट्र भूषण श्री महंत आनंदजी महाराज खंडागळे यांच्या शुभ हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ते म्हणाले, देशाच्या रक्षणार्थ सीमेवर रात्रंदिवस पहारा देऊन नागरिकांची सुरक्षा करणारे सैनिक आपल्या जीवाची पर्वा करीत नाही. ते जागून रक्षण करतात. म्हणूनच आपण आपल्या घरी निवांत झोपतो. देशाच्या रक्षणार्थ वीरमरण पत्करणारे शहीद जवान व त्यांच्या कुटुंबीयांचा आम्हाला अभिमान आहे. हे सैनिक फक्त सीमेवर लढत नाही तर देशात कुठेही आतंकवाद, नक्षलवाद यांचा खात्मा करण्याकरिता व कुठल्याही आपत्तीच्या वेळी जनतेच्या सुरक्षेकरिता तत्पर असतात, असे हभप आनंद महाराज खंडागले म्हणाले.
सत्कारमूर्तींमध्ये वावढंल येथील माजी सैनिक विठ्ठल नारायणराव कदम, दत्ताराम सखाराम कदम, विजय परशुराम कदम, शंकर जयसिंगराव कदम, वसंतराव राजाराम कदम, रामचंद्र राजाराम कदम, मनोहर शिवराम कदम, पांडुरंग जयसिंगराव कदम, तर कोयना येथील पांडुरंग जाधव, वाशिवली येथील प्रवीण एकनाथ पाटील, नदोडे येथील तुषार येरूनकर, कुणाल येरूनकर, होराळे येथील दिलीप नामदेव बुरुमकर, अकोले येथील विनोद अर्जुन कदम आणि जळगावचे जितेंद्र बाविस्कर व सूर्यकांत माधवराव केंद्रे यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात परिसरातील वारकरी मंडळी, दिग्गज मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार चैतन्यदासजी महाराज खंडागळे यांनी केले.