पनवेल : प्रतिनिधी
पनवेलचे तलाठी कार्यालय नवीन वास्तूत बुधवारपासून सुरू झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील महसूल विभागाच्या जागेत न जाता जुन्या ठिकाणी बांधलेल्या नवीन वास्तूत यावे, अशी माहिती मंडल अधिकारी संदीप रोडे यांनी दिली आहे.
पनवेल तलाठी कार्यालयामार्फत नागरिकांना 7/12 नक्कल, गाव नमुना 6-8च्या नक्कल, रहिवासी दाखले, उत्पन्नाचे आणि जातीच्या दाखल्यासंबंधी चौकशी अहवाल दिला जातो. त्यामुळे महसूल खात्यातील तलाठी कार्यालय हे नागरिकांसाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे 12 महिने इथे नागरिकांची गर्दी असते. पनवेल शहरात लाईन आळीत अनेक वर्षापासून तलाठी कार्यालय होते. ते जुने असल्याने त्याची दुरवस्था झाली होती. इमारत धोकादायक झाल्याने कामासाठी येणार्या नागरिकांच्या आणि तेथे काम करणार्या कर्मचार्यांच्या जीवाला धोका होता.
या इमारतीची डागडुजी करण्यासाठी येथील कार्यालय क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील महसूल विभागाच्या जागेत हलवण्यात आले होते. पावसाळ्यात या जागेत महत्त्वाची कागदपत्रे आणि जुने रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची सोय नव्हती. नवीन इमारतीचे काम पूर्ण झाल्याने त्या ठिकाणी पनवेलचे एक ते चार तलाठी आणि मंडल अधिकारी यांची एकत्र बसण्याची सोय झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळही वाचणार असल्याने बुधवार 12 जूनपासून ते नवीन वास्तूत हलविण्यात आले आहे. या ठिकाणी तलाठी सुरेश राठोड, मनीष जोशी आणि मंडल अधिकारी संदीप रोडे काम पाहणार आहेत.