ट्रेंट ब्रिज : वृत्तसंस्था
वर्ल्डकपमध्ये सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. कोहलीची प्रत्येक खेळी ही कोणता ना कोणता तरी विक्रम मोडणारी ठरते, त्यात त्याच्या विक्रमाची तुलना तेंडुलकरशी केली जाते. त्यामुळे किवींविरुद्ध 57 धावा केल्यास कोहली तेंडुलकरच्या आणखी एका विक्रमाला गवसणी घालणार आहे.
कोहलीला वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा पूर्ण करण्यासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. कोहलीच्या नावावर सध्या 221 डावांत 10943 धावा आहेत आणि वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. जर न्यूझीलंडविरुद्ध त्यानं 57 धावा केल्या तर 11 वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा कोहली हा पहिलाच फलंदाज ठरेल. वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हा पल्ला पार केला आहे.
याशिवाय कोहलीला न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतक करणार्या वीरेंद्र सेहवाग व रिकी पाँटिंग यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचीही संधी आहे. शिवाय न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणार्या भारतीय फलंदाजांत दुसर्या स्थानी झेप घेण्याचा विक्रमही त्याला खुणावत आहे. सेहवागनं किवींविरुद्ध 23 डावांत 1157 धावा केल्या आहेत, तर तेंडुलकरच्या नावावर 1750 धावा आहेत. कोहलीनं 19 डावांत 1154 धावा केल्या आहेत.