उरण : प्रतिनिधी
मुंबई विभागाच्या उरण एसटी आगारात संपकरी कामगार हळूहळू पुन्हा कामावर येण्यास सुरुवात झाली असून 230 कर्मचार्यांपैकी सुमारे 200 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे 50 टक्क्यांहून अधिक बससेवा सुरू झाली असल्याची माहिती उरण एसटी आगाराचे प्रमुख सचिन मालशे यांनी दिली आहे. ऑक्टोबर 2021 पासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले होते. सहा महिने सुरू असलेल्या संपामधील उरण एसटी आगारातील सुमारे 200 कर्मचारी परतले आहेत. जे कर्मचारी परतले आहेत. त्यामधील सर्व कर्मचार्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, तसेच वाहकांना पुन्हा प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या आगोदर उरण एसटी वाहतूक ही सेवा पाच टक्के सुरू करण्यात आली होती, परंतु आता कामगार कामावर रुजू झाल्याने 50 टक्क्यांपर्यंत गेली आहे. सध्या दादर, ठाणे, वाशी, पनवेल, अलिबाग, पेण तसेच ग्रामीण भागात सर्वत्र बससेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती सचिन मालचे यांनी दिली आहे.