मुंबई : प्रतिनिधी
नीरा देवघर धरणातील पाणी वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे निंबाळकर-उदयनराजे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मुंबईत बैठक बोलविली होती. मात्र, शरद पवारांची शिष्टाई निष्फळ ठरली आहे. या वेळी बैठक अर्ध्यावर सोडून उदयनराजे बाहेर आले आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. दोन राजांमधील या वादामुळे राष्ट्रवादी अडचणीत आली आहे.
दरम्यान, नीरा डाव्या कालव्याच्या वादात राज्य सरकारने थेट कृती करत बारामतीला जाणारे 60 टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे आदेश काढले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी माढ्याला हक्काचे पाणी मिळणार, असे वक्तव्य केले होते. अखेर नवनिर्वाचित खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आणि माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे महाजन यांनी आदेश काढले आहेत. या पाणी वाटपावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक, निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वयंघोषित भगिरथाने जाणीवपूर्वक या भागातील कालव्यांची कामे रखडवल्याने हे तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी रामराजे नाईक- निंबाळकर यांच्यावर टीका केली.