Breaking News

संतांच्या कार्यातून ऊर्जा मिळते – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देहू : प्रतिनिधी
मनुष्यजन्मात संतांचा सत्संग हा दुर्लभ असतो, असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. संतांच्या कार्यातून नित्य ऊर्जा मिळते. संतांची कृपा झाली, तर भगवंताचा साक्षात्कार आपोआप होतो. आज देहू या पवित्र तीर्थक्षेत्री येताना मलाही असेच वाटत आहे. देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही, तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 14) येथे काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी त्यांनी वारकरी तसेच जमलेल्या जनतेस संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारतीय संस्कती, संतपरंपरेबद्दल गौरवोद्गार काढले तसेच भारत देशाची प्रगती आणि सध्या सुरू असलेल्या विकासकामांवर भाष्य केले.
या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मारुतीबाबा कुरेकर महाराज, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, आचार्य तुषार भोसले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, भगवान श्री विठ्ठल आणि सर्व वारकर्‍यांच्या चरणावर माझे कोटी कोटी वंदन. आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे, मनुष्य जन्मात सर्वांत दुर्लभ संतांचा सत्संग आहे. संतांची कृपा झाली, तर ईश्वराची अनुभती आपोआप होते. आज देहूच्या या पवित्र, तीर्थ भूमीवर मला येण्याचे भाग्य लाभले आणि मीदेखील इथे तिच अनुभती घेत आहे. देहू संतशिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आहे, कर्मस्थळदेखील आहे. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव. तेथे नांदे देव पांडुरंग, धन्य क्षेत्रवासी लोक ते देवाचे. उच्चारीती वाचे नामघोष. देहूमध्ये पांडुरंगाचा नित्य निवासदेखील आहे आणि इथला प्रत्येकजण स्वतः भक्तीने ओतप्रोत असा संतस्वरुपच आहे. या भावनेने मी देहूतील सर्व नागरिकांना माझ्या माता-भगिनींना आदरपूर्वक नमन करतो.
आज पवित्र शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी मला देहूत येण्याची संधी मिळाली हे मी माझे सौभाग्य समजतो. ज्या शिळेवर स्वत: संत तुकारामांनी 13 दिवस तपस्या केलेली आहे, जी शिळा संत तुकारामांच्या बोध आणि वैराग्याची साक्ष बनलेली आहे ती केवळ एक शिळा नाही, ती तर भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा स्वरूप आहे, असे मी मानतो. या पवित्र ठिकाणाची पुर्ननिर्मिती करण्यासाठी मी मंदिर न्यास आणि सर्व भक्तांचे हृदयपूर्वक अभिनंद करतो, आभार व्यक्त करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
सध्या देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. आम्हाला अभिमान आहे की, आम्ही जगातील प्राचीन जीवित सभ्यतांपैकी एक आहोत. याचे श्रेय जर कोणाला जात असेल, तर भारताच्या संत परंपरेला आहे. भारताच्या ऋषींना आहे. भारत शाश्वत आहे, कारण भारत संतांची भूमी आहे. अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी देशातील संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.
संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही, जो वेळेसोबत शाश्वत आणि प्रासंगिक राहतो तोच तर अभंग असतो. आजदेखील देश जेव्हा आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जात आहे तेव्हा संत तुकारामांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
संत भिन्न परिस्थितीत समजाला गती देण्यासाठी पुढे येतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या जीवनात तुकाराम महाराजांसारख्या संतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकांना शिक्षा झाली तेव्हा ते तुरुंगात तुकाराम महाराजांचे अभंग गात असत. वेगवेगळा कालखंड वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, पण या सर्वांसाठी संत तुकाराम यांची वाणी आणि ऊर्जा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता आषाढामध्ये पंढरपूरची यात्रा सुरु होणार आहे. चारधाम यात्र असो, अमरनाथ यात्र असो या यात्रा आपल्यासाठी एक ऊर्जास्त्रोत आहेत. याच यात्रांच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनेला जिवंत ठेवलेले आहे. विविधता असताना भारत हजारो वर्षांपासून एका राष्ट्राच्या रूपात उजूनही उभा आहे. आपल्या राष्ट्रीय एकतेला मजबूत करण्यासाठी आपले काही कर्तव्य आहे. आपण आपली प्राचीन ओळख आणि परंपरा यांना चैतन्यपूर्ण ठेवले पाहिजे.
काही महिन्यापूर्वी मला पालखी मार्गातील दोन राष्ट्रीय राजमार्गांच्या चौपदरी करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली होती. श्री संत ज्ञानेश्वर महारज पालखी मार्गाची निर्मिती पाच टप्प्यांमध्ये होईल आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाची निर्मिती तीन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाईल. या सर्व टप्प्यांमध्ये 350 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे महामार्ग बनतील आणि यावर 11 हजार कोटींपेक्षाही जास्त रुपये खर्च केले जातील. या प्रयत्नांनी क्षेत्राच्या विकासालादेखील गती मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल होताच त्यांचा संत तुकाराम महाराजांची पगडी, उपरणे, टाळ, चिपळ्या, वीणा आणि तुळशीची माळ घालून नितीन महाराज मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच या वेळी त्यांना संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिकृती देण्यात आली.
पंतप्रधान खर्‍या अर्थाने वारकरी -देवेंद्र फडणवीस
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. संत तुकाराम महाराजांनी जो मार्ग दाखवला होता त्या मार्गावर चालण्याचे काम आपले पंतप्रधान करीत आहेत. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हाच मंत्र पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारला आणि गरीब कल्याणाची मोहीम हाती घेत रंजल्या गांजल्यांसाठी काम करीत आहेत. म्हणून आपले पंतप्रधान खर्‍या अर्थाने वारकरी आहेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक केले.

Check Also

पनवेलमधील विजेचा प्रश्न निकाली

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील छत्रपती …

Leave a Reply