Breaking News

काशीद समुद्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

औरंगाबादची सहल; तिघे बचावले

मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात बुडून औरंगाबादमधून सहलीला आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 9) घडली, तर तिघांना वाचविण्यात यश आले.
सध्या मुरूड तालुक्यातील पर्यटनस्थळांवर राज्यातून मोठ्या प्रमाणात शालेय सहली येत आहेत. अशाच प्रकारे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल सोमवारी काशीद येथे आली होती. सुमारे 80 विद्यार्थ्यांचा समूह दुपारी 3च्या सुमारास काशीद समुद्रकिनारी उतरला होता. यापैकी पाच विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी गेले. पोहता पोहता हे पाचही जण खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. जवळच असणार्‍या लोकांना मुले बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पाण्यात उड्या टाकल्या व पाचपैकी तिघांना किनारी सुखरूप आणलेे.
उर्वरित दोन विद्यार्थी खोल पाण्यात गेल्याने त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. यापैकी एकाचा मृतदेह त्वरित सापडला, तर दुसरा मुलगा सापडत नव्हता. यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू ठेवल्यानंतर काही तासानंतर दुसर्‍याचाही मृतदेह सापडला. प्रणव कदम व रोहन बेडवाल अशी त्यांची नावे असून त्यांचे वय सुमारे 15 वर्षापर्यंत असल्याचे सांगण्यात आले, तर कृष्णा पाटील, तुषार वाघ व अन्य एकाला वाचविण्यात यश आले. त्यांना उपचारासाठी बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहे.

Check Also

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलमधील आई मरिआई मित्र मंडळ रोहिदासवाड्याच्या वतीने आमदार चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply