Breaking News

खारघर हिल पावसाळ्यात पर्यटकांसाठी बंद राहणार

खारघर : प्रतिनिधी

पावसाळ्यात खारघर टेकडीवर होणार्‍या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळण्यासाठी सिडको प्रशासनाने 15 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत खारघर टेकडीवर पर्यटकांसाठी प्रवेश बंद केला आहे, मात्र टेकडीवरील चाफेवाडी, फणसवाडी येथील गावकर्‍यांना यामधून सूट असणार आहे. खारघर सिडकोने यासंदर्भात खारघर पोलिसांना नुकतेच पत्र दिले आहे.

दि. 15 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद असणार आहे. नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर टेकडी हे ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाहून संपूर्ण नवी मुंबई शहराचे विहंगम दृश्य पाहावयास मिळते. सिडकोने या ठिकाणी जाण्यासाठी डांबरी रोड, पथदिवे देखील बसविले आहेत. शहरामधील अनेक नागरिक या ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येतात, मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळेच सिडकोने या ठिकाणी प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने या ठिकाणी सहा सुरक्षा रक्षकदेखील नेमले आहेत, मात्र काही अतिउत्साही पर्यटक सुरक्षा रक्षकांना न जुमानता टेकडीवर जातात, अशा पर्यटकांना रोखण्यासाठी सिडकोच्या वतीने खारघर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार खारघर पोलीस ठाण्याच्या वतीने या ठिकाणी पोलीस नियुक्त करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली.

शनिवारी, रविवारी या टेकडीवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळते. तरुणांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो, मात्र पर्यटकांनी या ठिकाणी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आम्ही हा निर्णय घेतला आहे. पर्यटकांनी त्यांचे पालन करावे, असे आवाहन सिडकोचे खारघरमधील अधिकारी संजय पुदाळे यांनी केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply