Breaking News

कर्जतमधील शेतकर्यांचे लागलेत पावसाकडे डोळे

बोअरवेलचे पाणी वापरण्याची वेळ

कर्जत ः प्रतिनिधी

मागील 10 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या सरी कोसळल्यानंतर शेतकर्‍यांनी आपल्या शेतात भाताची पेरणी केली आहे, परंतु त्यानंतर पाऊस गायब झाल्याने पेरलेले बियाणे फुकट जाण्याची वेळ कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांवर आली आहे. काही शेतकर्‍यांनी बियाणे जगविण्यासाठी शेतात बोअरवेलचे पाणी वापरण्यास सुरुवात केली आहे. जून महिना संपत आला तरी पावसाला सुरुवात होत नसल्याने शेतकरी चिंतेत असून संकटात सापडले आहेत.

काही दिवसांपूर्वी कर्जतसह सर्वत्र पावसाच्या सरी कोसळल्यानंतर शेतकर्‍यांनी भाताची पेरणी केली होती. रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर शेतकरी धुळीवर पेरणी करतात, त्याला धुळपेर असेही म्हणतात. असे केल्याने लावणी लवकर होत असते, परंतु शेतीच्या पेरणीच्या दृष्टिकोनातून मुबलक पाणी नसल्याने बियाणे करपण्याची भीती निर्माण झाली आहे. पेरलेल्या बियाणांचे कोंब सुकू नये यासाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. भाताची केलेली पेरणी फुकट जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे सुगवे येथील शेतकरी गजानन पेमारे यांनी आपल्या शेतात बोरवेलचे पाणी पाईपलाईनने घेऊन पेरणी केलेल्या शेतात सोडले आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण तालुक्यात दिसून येत आहे. शेतकरी आपापल्या पद्धतीने पाणी आणून शेतात शिंपडत आहेत. पाऊस लांबल्याने दुबार पेरणी करावी लागेल की काय, अशी भीतीही शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.

Check Also

यंदाचा नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात होणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमागील वर्षी नमो चषक क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्याचप्रमाणे …

Leave a Reply