चौक ः रामप्रहर वृत्त
चौक गाव बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम येथील ग्रामस्थांनी थांबविले होते. गटारांचे काम केल्यानंतरच रस्त्याचे बांधकाम करा, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने आमदार महेश बालदी यांनी येथे सोमवारी (दि. 2) भेट घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. नियोजित काम पूर्ण करून पुढील वेळी आमदार निधीतून किंवा अन्य निधीतून सहाय्य करून हे रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
पूर्वी चौक गावातून मुंबई-पुणेकडे जाणारा महामार्ग होता. कालांतराने सातत्याने होणारे अपघात यामुळे हा मार्ग बाहेरून काढण्यात आला. या मार्गाचे काँक्रिटीकरण करणे गरजेचे असल्याने कामास सुरुवात झाली होती, परंतु कोरोना काळात हे काम बंद पाडले होते. त्यानंतर पुन्हा हे काम सुरू करण्यात आले. काम होत असलेल्या ठिकाणी कोल्हापूर पेठेत जुन्या प्रकारचे वस्ती असल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी पाणी निचरा होत नाही. त्यामुळे येथील घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरते. हे काम सुरू असताना प्रथम गटार बांधकाम करून नंतरच रस्त्याचे काम पूर्ण करा अशी येथील ग्रामस्थांनी मागणी केली होती. ग्रामस्थांनी हे काम बंद केले होते. त्यांची समस्या लक्षात घेऊन आमदार महेश बालदी यांनी येथे भेट देऊन व संपूर्ण रस्त्याची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. नियोजित काम पूर्ण करून पुढील वेळी आमदार निधीतून किंवा अन्य निधीतून सहाय्य करून हे रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही दिली, तसेच ठेकेदाराशी चर्चा करून कामास पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे येथील रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.
या वेळी भाजप खालापूर तालुका ध्यक्ष रामदास ठोंबरे, चौक जि. प. विभाग गणेश मुकादम, उपसरपंच चौक गणेश कदम, मनोज साखरे, रंजीत खंडागळे, पंकज शहा, वैभव भोइर, अभिजित देशमुख, परेश शहा, विनोद भोईर, सागर ओसवाल, निखिल मालुसरे, तन्वीर शेख, अवधूत करमरकर, दत्ता भोइर, जया ओसवाल, योगेंद्र शहा हे उपस्थित होते.