पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्करोगाविषयी लोकांत जागरूकता निर्माण करण्यासाठी धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या वतीने खारघरमध्ये बुधवारी (दि. 3) चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एशियन कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉ. निशा अय्यर यांनी मार्गदर्शन केले. 1 ते 7 एप्रिल हा आठवडा तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींसाठी कर्करोग जागरूकता सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. या सप्ताहानिमित्त धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेतर्फे खारघर सेक्टर 4मधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये सायंकाळी 4 वाजता कर्करोगाविषयी लोकांत जागरूकता निर्माण करण्यासाठी चर्चासत्र घेण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात एशियन कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉ. निशा अय्यर यांनी भारतातील युवकांमध्ये आढळणार्या विविध कर्करोगांची माहिती दिली, तसेच ते टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे तेही समजावून सांगितले. कॅम्पसमध्ये असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविल्यास तरुणांमध्ये जागरूकता निर्माण होईल. तरुण वयात कॅन्सरमुळे भारतासारख्या तरुणांच्या देशात लोकांचा हकनाक जीव जाणार नाही. तरुणांतील अनारोग्याच्या अनेक समस्या यामुळे नक्कीच दूर होतील, असेही त्यांनी नमूद केले. निप्टने या कार्यक्रमासाठी उत्तम सहकार्य केले. यापुढेही धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या कामात मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.