नगर परिषदेकडून 135 घरांना नोटीस
कर्जत : प्रतिनिधी
पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन, खबरदारी म्हणून नगर परिषद प्रशासनाने शहरातील 135 घरांना नोटीसी बजावल्या आहेत व तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नगर परिषद हद्दीतील मुद्रे बुद्रुक, गुंडगे आणि भिसेगाव या ठिकाणी टेकडीखाली वस्ती, घरे आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तेथील दरड कोसळून जीवित व वित्तहानी होण्याचा संभव आहे. दक्षता म्हणून नगर परिषदेने मुद्रे बुद्रुक गावातील 70, गुंडगे गावातील 59 आणि भिसेगाव गावातील सहा अश्या एकूण 135 घरांना नोटीस दिल्या आहेत. पावसाळ्यात या टेकडीची दरड कोसळून तुमच्या घराचे नुकसान होण्याचा संभव आहे, अशी नैसर्गिक दुर्घटना टाळण्यासाठी तुम्ही त्वरित अन्य सुरक्षित ठिकाणी राहण्यास जावे, अन्यथा दरड कोसळल्यामुळे, अतिवृष्टीमुळे काही नैसर्गिक दुर्घटना घडून जीवित व वित्तहानी झाल्यास त्यास सर्वस्वी तुम्ही जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.