पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20मधील तक्का गावातील व आजूबाजूच्या परिसरातील मंजूर विकासकामांच्या निविदा त्वरित प्रसिध्द करण्यात याव्या, अशी मागणी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जयंत पगडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख व महापौर डॉ. कविता चौतमोल यांना निवेदन दिले आहे. पगडे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, तक्का गाव व आजूबाजूचा कॉलनी परिसर प्रभाग क्रमांक 20मध्ये येत आहे. या भागाची लोकसंख्या सुमारे 20 ते 25 हजारांच्या आसपास आहे. मागील काही महासभांमध्ये प्रभागातील काही विकासकामे मंजूर झाली असून, सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने ती तातडीने करणे गरजेचे आहे. ही कामे पूर्ण झाल्यास भागातील आरोग्य सुविधा चांगल्या प्रमाणात उपलब्ध होवू शकतील, तसेच लोकांना रहदारीसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते (काँक्रीटीकरण) निर्माण होणार आहेत. या कामांच्या निविदा पनवेल महानगरपालिकेमार्फत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्वरित प्रसिद्ध करण्यात याव्या. अशी तक्का गावातील व कॉलनी परिसरातील नागरीकांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. मोती बेकरी ते तक्का गाव मुख्य रस्ता काँक्रीटीकरण, मुंबई-पुणे हायवे ते नवीन साईबाबा मंदिर ते पनवेल रेल्वेस्थानकासमोरील चौकापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे, तक्का गावातील सर्व भागांत भूमिगत ड्रेनेज लाइन टाकणे व मुख्य ड्रेनेज लाइनला जोडणे, तक्का गावातील सर्व गटारांची बांधकामे करणे व स्टार्म वॉटर ड्रेनची कामे करणे या निविदा त्वरित प्रसिद्ध करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे पगडे यांनी केली आहे.