Breaking News

ग्रीनफील्ड कोकण द्रूतगती महामार्गाची घाई कशासाठी

कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याचबरोबर रेवस-रेड्डी या सागरी महामार्गाला मंजुरी मिळालेली आहे. या दोन्ही महामार्गांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. दोन राष्ट्रीय महामार्ग असताना महाराष्ट्र शासनाने आता ग्रीनफील्ड कोकण द्रूतगती महामार्ग या तिसर्‍या महामार्गाला मंजुरी दिली आहे. वास्तविक मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम, त्याचबरोबर रेवस-रेड्डी या सागरी महामार्गाचे काम प्रगतिपथावर असताना कोकणात जाण्यासाठी तिसर्‍या महामार्गाची घाई कशासाठी. कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग व रेवस-रेड्डी सागरी महामार्ग हे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत. या दोन राष्ट्रीय महामार्गाव्यतिरिक्त ग्रीनफील्ड कोकण द्रूतगती महामार्गाचा घाट महाराष्ट्र शासनाने घातला आहे. पनवेल तालुक्यातील चिर्ले गावातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवीपर्यंत हा महामार्ग प्रस्तावित आहे. हा महामार्ग पनवेल, पेण, रोहा, माणगाव, महाड, खेड, चिपळूण, देवरूख, लांजा, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्यांमधून जाणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास पाच तासात होईल. हा महामार्ग पनवेल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाईल. सुमारे 500 किमी अंतराच्या या कोकण महामार्गाच्या कामाचे सर्वेक्षणदेखील येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. कोविडमुळे राज्याची आर्थिक घडी कोलमडली आहे. विकासकामांसाठी निधी मिळत नाही. विकासकामे रखडली आहेत. असे असताना 70 हजार कोटींचा ग्रीनफील्ड कोकण द्रूतगती महामार्ग उभारण्याची योजना आखली जात आहे. या खर्चात कोकणातील काही इतर रस्त्यांची कामे होऊ शकतात. इतर सुविधा दिल्या जाऊ शकतात. कोकणात जाणार्‍या या तिसर्‍या महामार्गाला विरोध असण्याचे कारण नाही, पंरतु ज्या सुविधा कोकणासाठी प्राधान्याने देण्याची गरज आहे, त्या दिल्या पाहिजेत. कोकणात पर्यटनवाढीसाठी दळणवळणाच्या उत्तम सुविधा असायलाच हव्यात, पंरतु हे होत असताना तेथील निसर्गाचा र्‍हास होणार नाही, पर्यावरणाची हानी होणार नाही याचाही विचार केला गेला पाहिजे. कोकणच्या विकासासाठी सागरी महामार्गाची संकल्पना माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी 1980 मध्ये पहिल्यांदा मांडली होती. रेवस ते रेड्डी असा 540 किलोमीटर लांबीचा हा सागरी महामार्ग झाला असता, तर कोकणच्या पर्यटन विकासाला चालना मिळाली असती, परंतु या महामार्गाचे काम रखडले आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गावर अस्तित्वात असलेल्या अरूंद व कमकुवत पुलांची पुनर्बांधणी करणे, आवश्यक तेथे नवीन खाडी पूल व बाह्य वळण रस्त्यांची बांधकामे केली जाणार आहेत. त्याला मान्यता देण्यात आली आहे. कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर हा सागरी महामार्ग बांधण्यात येणार आहे. त्याची लांबी 447 किमी असेल. 10 मीटर रुंदीचा काँक्रीटचा हा रस्त असेल. आठ मोठे खाडीपूल व दोन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. 33 गावांमध्ये बाह्यवळण रस्ते असतील. या ग्रीनफील्ड कोकण द्रूतगती महामार्गासाठी 848 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.  सध्या मुंबईहून कोकणात किंवा पुढे गोव्यात रस्त्याने जायचे म्हटल्यास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहतुकीचा ताण पडतो. अनेकदा या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होते. सध्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण करून घ्यायला हवे. मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय म्हणून सागरी महामार्ग बांधण्यात येत आहे. हा सागरी महामार्ग पूर्ण झाल्यास कोकणातील अंतर्गत भागात पर्यटनाला चालना मिळेल. मुंबई ते गोवा हे अंतर कमी होईल. त्यामुळे वेळ व पैशाची बचत होणार आहे. या महामार्गासाठी अनेकदा प्रयत्न झाले, चर्चा झाल्या, परंतु नंतर पुन्हा या महामार्गाचे काम रखडले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम व्हायला हवे. ती सध्याची गरज आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करावे. कोकणात जाण्यासाठी कोकण रेल्वे आहे. या रल्वेमार्गाचे दुपदरीकरण व्हायला हवे, तसेच कोकणात जाण्यासाठी जलवाहतूक हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही. भूसंपादनाची गरज भासणार नाही. जी बंदरे गाळाने भरली आहेत, तेथील गाळ काढून या बंदरांमधून कोकणात जाण्यासाठी प्रवासी जलवाहतूक सुरू करता येईल. यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्याला प्राधान्य द्यायला हवे. कोकणात ग्रीनफील्ड कोकण द्रूतगती महामार्ग हा तिसरा महामार्ग बांधण्यासाठी घाई करण्याची गरज नाही.

-प्रकाश सोनवडेकर

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply