Breaking News

पेपरलेस कारभार एक भ्रम…

गेली काही वर्षे आपण पेपरलेसच्या गोष्टी ऐकतोय व त्याच्या गप्पाही मारतोय. संगणकीकरण, डिजिटलायजेशन वगैरेमुळे पेपर्स वापरण्याचे प्रमाण कमी होईल असे खरंच वाटत होते. मलाही बरे वाटले होते. पर्यावरण, झाडे वगैरे वाचतील हा विचार नंतरचा, पण टाईप केलेल्या कागदांचे ओझे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेणे वाचेल म्हणून मला जास्त आनंद होत होता, पण परवाच एका वकील मित्राकडे बसलो असता तो संवाद कानावर पडला आणि मी भानावर आलो. मित्राकडे आलेला क्लाइंट मित्राला त्याच्या कागदपत्रांच्या किती प्रती काढू, असे विचारत होता आणि वकीलसाहेबांनी शांतपणे 15 प्रती काढा, असे अगदी सहजतेने सांगितले. किमान दीडेकशे कागदांच्या प्रत्येकी 15 प्रती काढा म्हणणे मला विचार करायला भाग पाडू लागले.

कॉम्प्युटर, डिजिटायजेशनमुळे कागदी घोडे नाचवणे थांबेल असे वाटत होते, पण प्रत्यक्षात होतेय उलटच. कॉम्प्युटर, प्रिंटर अगदी हाताशी आल्यापासून कागदाचा वापर आणि बेपर्वाई खूप वाढली आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. काही काळापूर्वी हाताने लिहिताना खूप काळजी घेतली जायची. काही चुकल्यास पुन्हा सगळे लिहावे किंवा टाईप करायला लागायचे व ती मेहनत टाळण्यासाठी पहिल्यापासूनच लक्ष देऊन काळजीपूर्वक लिहिले जायचे, परंतु आता मात्र कॉम्प्युटर टायपिंग झाल्यापासून टायपिंग सुबक व छान होते, मात्र त्यातील टायपोग्राफिक चुका सुरुवातीला तेवढ्याशा काळजीपूर्वक स्क्रीनवरच तपासल्या जात नाहीत. टाईप करून पहिला एक ड्राफ्टचा प्रिंट आऊट काढला जातो व मग तो तपासला जातो. त्यातील चुका स्क्रीनवर दुरुस्त करून पुन्हा प्रिंट आऊट काढला जातो व त्यात बारीकशी जरी चूक आढळली तरी ती नंतर दुरुस्त करून पुन्हा फायनल प्रिंट आऊट काढला जातो. त्यात लेटरहेडचे माप, मार्जिन वगैरे गोष्टी तपासताना फायनल ड्राफ्टच्या पुन्हा दोन-चार एकदम फायनल ड्राफ्ट काढून मग पत्र फायनल केले जाते. मग एकदाचे फायनल झालेले पत्र प्रिंटिंगला सोडले जाते आणि मग लक्षात येते की अरेरे, ते नेमके लेटरहेडच्या मागच्या बाजूला छापले गेले आणि मग आणखी एक 80 जीएसएमचा देखणा आणि महागडा कागद शहीद होऊन दुसरे लेटरहेड प्रिंटरच्या मुखात सोडले जाते. एका पानाचे एक पत्र टाईप करायचे असल्यास असे किमान सात-आठ कागद कचर्‍याच्या डब्यात टाकले जातात. अशी दहाएक पत्र तरी रोज एका ऑफिसात टाईप केली जात असतील, तर शंभरएक तरी कागद विनाकारण वाया जात असतील. कॉम्प्युटर-प्रिंटरचा हा फायदा की तोटा हे कळत नाही, पण सोपे झाले की किंमत नाहीशी होते हे मात्र खरे.

आपण भले डिजिटायजेशनच्या गप्पा मारत असू, पण आपला ’लेखी’ गोष्टींवर जास्त विश्वास असतो. त्या बाबतीत मात्र आपण कॉम्प्युटरपूर्व युगातच आहोत. हातात कागद असल्याशिवाय आपला त्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. बरे नुसता ओरिजिनल कागद चालत नाही, तर तो हरवला तर काय म्हणून त्याच्या चार-पाच झेरॉक्स प्रती काढून ठेवायच्या आणि एवढे करूनही आयत्या वेळी एकही प्रत सापडत नाही म्हणून पुन्हा मूळ कागदाच्या आणखी प्रती काढायच्या. झेरॉक्स अतिस्वस्त झाल्याचा हा परिणाम. सगळ्याच गोष्टी गरजेपेक्षा जास्त झाल्याचा हा परिणाम. इथेही कागदाचे वेस्टेजच.

कोर्टाएवढा कागदाचा अपव्यय इतर ठिकाणी बहुतेक होत नसावा. अर्थात याला शासन अपवाद, कारण ते चालतेच कागदी घोड्यांवर. कोर्टात कागदपत्रांच्या ज्या अमाप प्रती काढल्या जातात, त्या अशिलाचे आणि वादीचे वकील सोडले तर इतर पक्षकारांपैकी कुणी वाचत असेल का याची शंकाच आहे. तरीही नियम म्हणजे नियम, कागदे दिलीच पाहिजेत, मग ती फुकट गेली तरी चालतील. जे कागदावर असते ते आपण कॉम्प्युटरच्या किंवा स्मार्टफोनच्या स्क्रीनवरही सहज पाठवू शकतो, पाहू शकतो आणि गरज लागल्यासच प्रिंट आऊटही घेऊ शकतो. तरीही आपल्याला प्रिंटेड कागदेच का द्यावी लागतात हे समजण्याच्या पलीकडचे आहे. कित्येक वकिलांच्या ऑफिसमधून असे उघडूनही न पाहिलेले गठ्ठे महिनाअखेरीस रद्दीच्या दुकानात विकायला आलेले दिसतील. माणसे दिलेला शब्द पाळायला शिकली तरी देशातील सर्व कोर्ट्स दुसर्‍या दिवसापासून बंद पडतील. मग पेपर तर सोडाच, लाईट-पाणी आणि ज्युडिशिअरीवर होणारा खर्चही वाचेल. अर्थात हा माझा वेडा आशावाद आहे. तसे होणार नाही.

असेच शासनात चालते. बाजूच्या टेबलावर बसलेल्या बाबूकडेही लेखी कागद पाठवले जातात. कारण पुरावा म्हणून. त्यात काय लिहिले आहे हे महत्त्वाचे नसते, तर मी तुला ’लेखी’ कळवले हे कळणे महत्त्वाचे असते. विधानसभेचे अधिवेशन चालू असताना तर शासनाच्या अनेक महामंडळांचे अहवाल, अधिवेशनात विचारले जाणारे तारांकित-अतारांकित प्रश्न, शासकीय-अशासकीय ठराव व इतर अनेक कागदांच्या प्रती प्रत्येक आमदाराला देणे कायद्याने बंधनकारक असते. काही ठरावीक आमदार सोडले तर बाकीचे हा कचरा उघडूनही बघत नाहीत हा माझा अनुभव आहे. अनेकांना तर त्या महामंडळांची नावेही माहीत नसतात. तरी अशा एखाद्याला एखादी प्रत मिळाली नाही, तर तो आमदार सभागृहात बोंबाबोंब करतो. कुणी जर ते उघडूनच बघणार नसेल, तर द्यायचेच कशाला मुळात. सर्वांच्या मोबाइलवर किंवा ई-मेलवर त्या प्रती पाठवायच्या. ज्याला जे महत्त्वाचे वाटेल त्याची प्रत तो काढून घेईल. असे नाही का करता येणार? पण नाही, आम्हाला लेखीच मिळाले पाहिजे असा हट्ट असतो. इगोसाठी, दुसरं काय.

ई-मेलचेही तसेच. प्रमाण कमी असले तरी ई-मेलचेही दोन-दोन प्रिंट आऊट काढून फाईल करून ठेवणारे महाभाग आहेत आपल्याकडे. खरंतर ई-मेलमधील पत्रव्यवहार जोवर आपण डिलीट करत नाही तोवर तो तसाच असतो आणि कधीही-कुठेही पाहता-दाखवता येऊ शकतो. हे लक्षात न घेता सरळ प्रिंट आऊट घेऊन ठेवले जातात आणि कागद-फायलिंगची संख्या नाहक वाढवली जाते.

आपल्याकडे कागदाला ’पुरावा’ म्हणूनच भरपूर वापरला जातो. आपण राहतोय डिजिटल जगात, पण विचाराने मात्र त्याच अद्याप ’लेखी’ युगात आहोत. ’कागदा’ला आपल्या जीवनात अतोनात महत्त्व आहे. लांब पल्ल्याचे तिकीट हल्ली डिजिटल चालत असले तरी आपण त्याचे प्रिंट आऊट काढूनच प्रवासाला निघतो. त्याची कारणे दोन, एक म्हणजे डिजिटलवर आपला भरवसा नसतो आणि दुसरे म्हणजे तो तिकीट तपासणीस आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या तिकिटावर विश्वास ठेवेलच याची आपल्याला खात्री नसते. एकूण काय तर पेपर हवाच.

काही लोक डिजिटलचा दुरुपयोग करतात हे खरंय, पण म्हणून सर्वांनाच लबाड समजून एका मापाने तोलून कागदाची मागणी करणे कितपत योग्य आहे हे मला समजत नाही. डिजिटल प्रणाली जास्तीत जास्त सुरक्षित करणे हा त्यावरील उपाय आहे, प्रिंट आऊट नाही.

हवा तसा कागद वापरायचा, त्या कागदासाठी बेसुमार जंगलतोड करायची आणि वर ’शीऽऽ किती हॉट क्लायमेट होत चाललंय हल्ली’ म्हणून कागदाच्याच टिश्यूने चेहरा, कपाळ, नाक, गळ्याचा घाम पुसायचा हे कितपत योग्य आहे. टिश्यूवरून आठवले, हल्ली रुमालाने हात-चेहरा पुसणे मागासलेपणाचे समजतात म्हणे आणि टिश्यूपेपरचा वापर पुढारलेपणा. टॉयलेटमध्येही हल्ली पेपरच (वाचण्यासाठी नव्हे, तर…) वापरतात अनेक सुधारलेले मॉडर्न लोक. मॉडर्नपणाची निशाणीच आहे ती हल्लीच्या.

पूर्वी लोक निगुतीने कागद वापरायचे. लिहिताना, टाईप करताना पुरेपूर काळजी घ्यायचे. झेरॉक्सच्या आगमनापूर्वी कार्बन कागद वापरून प्रती काढल्या जायच्या. आताच्या कॉम्प्युटरसारखी त्यावेळच्या टाईपरायटरमध्ये सेव्ह करायची सोय नसली तरी डोक्यात सगळेच आपोआप ऑटो सेव्ह व्हायचे. गोळाबेरीज काय तर आधुनिक संगणकीय युगात आपण पेपरलेसच्या गप्पा मारतो, परंतु जास्तीत जास्त कागद वापरत ’ग्लोबल वॉर्मिंग’वर वातानुकूलित

केबिनमध्ये बसून चर्चा करीत असतो. कथनी आणि करनी यात काहीएक संबंध नसणारे आपण ढोंगी आहोत हे मात्र खरं.

-नितीन साळुंखे (मो. क्र. 9321811091)

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply