Breaking News

मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध -केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला

उरण : रामप्रहर वृत्त
आपल्या देशाला लांबच लांब समुद्रकिनारे लाभले आहेत. या सामुद्रिक संपत्तीवर उपजीविका करणार्‍या आमच्या मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासन कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री परषोत्तम रूपाला यांनी येथे दिली. सागर परिक्रमा कार्यक्रम 2023 अंतर्गत पाचव्या चरणाचा शुभारंभ बुधवारी (दि. 17) उरण तालुक्यातील करंजा जेटी येथून झाला. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, केंद्रीय मंत्री महोदयांच्या पत्नी श्रीमती रुपाला, केंद्रीय मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अभिलाष लेखी, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अतुल पाटणे, सहसचिव डॉ. जे. बालाजी, पंकज कुमार, भारतीय तटरक्षक दलाचे डीआयजी अनुराग कश्यप, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त महेश देवरे, सहाय्यक आयुक्त संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम केंद्रीय मंत्री रूपाला यांनी मच्छीमार बांधवांनी, माता-भगिनींनी त्यांच्या केलेल्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल सर्वांचे आभार मानून म्हटले की, केंद्र शासन मच्छीमार बांधवांच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. मच्छीमारांसाठी केंद्र शासनाने पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना सुरू केली आहे, त्याचा लाभ सर्व मच्छीमार बांधवांनी जरूर घ्यावा.
या सागर परिक्रमा कार्यक्रमांतर्गत मच्छीमार बांधव, त्यांच्या सर्व संघटना यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या ज्या समस्या, जे प्रश्न, त्यांच्या मागण्या समोर येतील त्या समस्यांची आणि शासनाच्या योजनांची व धोरणांची योग्य ती सांगड घालण्यात येईल. त्यात ज्या काही सुधारणा आवश्यक आहेत त्या निश्चित केल्या जातील, असे आश्वासन केंद्रीय मंत्री रूपाला यांनी या वेळी दिले.
भारताचे पहिले आरमार उभे करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीस नमन करून केंद्रीय मंत्री रुपाला यांनी अनेक वर्षे भारतीय नौदलाच्या ध्वजावर असलेले ब्रिटिश राजवटीचे चिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलून त्या जागी छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचे चिन्ह प्रदर्शित करण्याचा निर्णय समस्त भारतीयांचा अभिमान उंचावणारा असल्याचे नमूद केले.
केंद्र शासनाने चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात मच्छीमार बांधवांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून तब्बल सहा हजार कोटी रुपयांची अधिकची तरतूद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मनोगतात केंद्रीय मंत्री परषोत्तम रूपाला हे मच्छीमार बांधवांना अशा प्रकारे थेट भेट देणारे आणि त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधणारे पहिलेच केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्री असल्याचे सांगितले व त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.
या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, केंद्रीय मंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी अभिलाष लिखी, पंकजकुमार, करंजा मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ.अतुल पाटणे यांनी केले, तर सूत्रसंचालन वैशाली परिख व नितेश पंडित यांनी मानले. कार्यक्रमास मच्छीमार बांधव, मच्छीमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply