Breaking News

अमेरिकेने चिंता करू नये!

अमेरिकेचे धार्मिक स्वातंत्र्य या विषयावरचे जे ताजे प्रतिवृत्त प्रसिद्ध झाले आहे, त्यात भारतात धार्मिक अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत, अशी टिप्पणी करण्यात आली आहे. गायीवरून मुसलमानांच्या हत्या होत आहेत. नगरांची मुसलमानी नावे बदलण्यात येत आहेत आणि एकंदरीत मुसलमानांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होईल अशी धोरणे भारत सरकार राबवत आहे, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. वस्तुस्थिती पूर्णपणे अवगत करण्याची सर्व साधने उपलब्ध असतानाही ज्याविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टीने आणि राजकीय सोयी गैरसोय पाहून पाहिले जाते असा जगातील सगळ्यात मोठा विषय कोणता असेल तर तो भारतातील हिंदू-मुसलमान संबंध हा होय. यात एका अक्षराचीही अतिशयोक्ती नाही. याला कारण अर्थातच हिंदूंची आत्यंतिक आध्यात्मिकता आणि राजकीय उदासीनता आहे. तेव्हा जागतिक व्यासपीठावरून मांडण्यासाठी हिंदूंची काही बाजू आहे का याचा विचार करू. आमच्या अंतर्गत व्यवहारात अमेरिकेला लक्ष घालण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका आपण घेऊ नये. दोन्ही देश लोकशाहीवादी आहेत आणि सबंध जग लोकशाहीवादी करण्याच्या दृष्टीने दोघांनी एकमेकांच्या जवळ येणे आणि त्यासाठी विश्वासाने एकमेकांना सूचना  करणे आवश्यक आहे. प्रश्न वेगळाच आहे. माणसाला नागरिक म्हणून प्राप्त झालेले सर्व प्रकारचे नैर्बंधिक स्वातंत्र्य आणि अधिकार निर्भयपणे उपभोगता यावेत म्हणून सरकारने अत्यंत जागरूक राहिले पाहिजे आणि तसे करताना माणसाच्या धर्माचा विचार केला जाता कामा नये. यासाठी अमेरिकेची पहिली घटना दुरुस्ती झाली. आज परिस्थिती अगदी वेगळी आहे. इस्लामी राष्ट्रातून अमेरिकेत वास्तव्यासाठी येणार्‍या लोकांवर बंदी घालावी असा सरकारचा विचार चालू आहे आणि तसे काही नियमही बनविण्यात आले आहेत. अशा प्रकारे भूमिका आरपार बदलण्यामागची कारणे जी असतील ती अमेरिकेने जगासमोर मांडली पाहिजेत. त्यामुळे जागतिक शांततेच्या दृष्टीने इस्लामसंदर्भात काही ठोस विचार करण्याची निकड असेल तर ती संबंधित राष्ट्रांना करता येईल.

जगातील सर्व विचारवंतांना हे मान्य असावे की जेथे पूर्णपणे आध्यात्मिक स्वातंत्र्य आहे असा भारत हा जगातील एकमेव देश आहे. त्यामुळे बहुधा हा देश जन्माला आला तेव्हापासूनच येथे सर्व धर्मांचे स्वागत झाले आहे. इसवीसन एकपासून भारत धर्मनिरपेक्ष राहिला असल्याचे इतिहासकार आळतेकरांनी लिहून ठेवले आहे. शक-कुशाण-हूण आक्रमक म्हणून भारतावर चालून आले आणि कधी येथील मुख्य प्रवाहात मिसळून गेले त्यांनाही कळले नाही. जगात अनेक ठिकाणी आमचा द्वेष झाला, पण भारताने आम्हाला प्रेमाने आणि सन्मानाने आश्रय  दिला आणि शतकानुशतके आमचा धर्म न सोडता तेथे शांततामय भयमुक्त जीवन आम्ही जगू शकलो, असे इस्त्रायल स्वतंत्र राष्ट्र म्हणून 1948मध्ये उभा राहिला तेव्हा ज्यूंनी अधिकृतपणे मान्य केले आहे. हिंदूंच्या सहजीवनाच्या कल्पना अत्यंत उदात्त आणि सहिष्णुतेच्या राहिल्या आहेत. त्यांना सर्वांत मोठा धक्का कोणी प्रथम दिला असेल तर तो इस्लामी राजकीय आक्रमकांनी. सहजपणे केलेल्या हजारो निरपराध हिंदूंच्या कत्तली, स्त्रीकडे भोगदासी म्हणून पाहण्याची लंपट वृत्ती, रांगत्या मुलाने खिदळत सहजपणे पत्त्यांचे बंगले पाडावेत तशी त्यांनी मूर्तिपूजेच्या द्वेषातून भुईसपाट केलेली लाखो मंदिरे, मूर्तींच्या केलेल्या मशिदीच्या पायर्‍या, स्वीकार इस्लामचा की मृत्यूचा हा त्यांनी असहाय रयतेला दिलेला पर्याय, नालंदा आणि तक्षशीला विद्यापीठातील ग्रंथालयांची केलेली राखरांगोळी इत्यादी अमानुष प्रकारांनी हिंदू मन जे भयग्रस्त झाले ते अजूनही पूर्णपणे मुक्त झालेले नाही. इतके करूनही हिंदुस्थानचे इस्लामीकरण करणे मीर कासीमपासून औरंगजेबापर्यंतच्या आक्रमकांना शक्य झाले नाही. संतांनी हिंदूंच्या हृदयातील धर्म जागता ठेवला. वीरांनी देशभक्ती जागती ठेवली. 1200 वर्षे न दमता निर्धाराने झुंज दिली. शिवाजी महाराजांनी या आक्रमकांना राजकीयदृष्ट्या नेस्तनाबूद करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि भारतभर मराठ्यांची मुद्रा भद्राय राजते स्वरूपाची सत्ता प्रस्थापित झाली. 

तेव्हा हिंदू-मुसलमान संबंधात हिंदू शोषक आहेत आणि मुसलमान शोषित आहेत ही जर जगाची समजूत असेल तर ती त्याने सोडली पाहिजे. हिंदू शोषित होते आणि आजही मानसिक पातळीवर बर्‍याच प्रमाणात आहेत. हिंदू राज्यकर्ते झाले तेव्हा पूर्वीच्या अत्याचारांचा सूड उगवण्यात आला नाही आणि मुसलमान सुखाने कालक्रमण करीत होते. मुसलमानांनी मात्र शोषक होण्याची संधी कधी सोडली नाही. भारतातील हिंदू-मुसलमान संबंध हा जगातील अद्भुत गोष्टींपैकी एक विषय आहे. त्याचबरोबर हेही खरे आहे की स्वतः: पीडित असूनही हिंदूंनी या विषयाचा कमीत कमी अभ्यास केलेला आहे आणि हेही बौद्धिक क्षेत्रातील जगातील एक आश्चर्य आहे. बेल्जियमचा कॉनरॅड एल्स्ट या विचारवंताला जेवढा हिंदू-मुसलमान प्रश्न कळला आहे तेवढा किती हिंदुत्ववादी विचारवंतांना कळला आहे याची शंका यावी अशी परिस्थिती दुर्दैवाने आहे. म्हणून मुसलमानांना मुख्य धारेत आणण्यासाठी  हिंदूंनी किती अभिनव प्रयोग प्रामाणिकपणे केले ते शोधले पाहिजे.

काँग्रेस पक्षाने 1885मध्ये आपल्या पहिल्याच अधिवेशनात हिंदी राष्ट्र स्थापन करण्याचा संकल्प सोडला. हा बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांसाठी केलेला जगातील आणि आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात मोठा त्याग होय. राष्ट्रीयत्व हा देशाचा प्राण असतो. ते हिंदूंनी मुसलमानांसाठी सोडले. 1200 वर्षे हिंदूराष्ट्र की इस्लामी राष्ट्र यासाठी युद्ध पेटले होते. त्यात हिंदू जिंकले. ब्रिटिशांचे राज्य आले तेव्हा मुसलमानांचा शक्तिपात झाला होता. तरीसुद्धा ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त होताना मुसलमानांचे सहकार्य घ्यावे असे हिंदूंना वाटले. त्यांचा विश्वास संपादिण्यासाठी त्यांनी दोघांनी मिळून नवे राष्ट्र निर्माण करण्याचा तोडगा सुचवला. प्रत्यकाचे धार्मिक अस्तित्व घरापुरते आबाधित, पण राजकीयदृष्ट्या सर्व हिंदी असा हा तोडगा होता. त्यानुसार आजपासून मी हिंदू नाही तर हिंदी आहे, असे न्यायमूर्ती रानड्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनात घोषित केले. जगात बहुसंख्याकांचे असे स्वेच्छापूर्वक राजकीय धर्मांतर कधीही आणि कोठेही झालेले नाही, मात्र अवघ्या तीन वर्षांनी मुसलमानांनी हिंदी राष्ट्राची संकल्पना लाथाडली आणि आम्ही स्वतंत्र तसेच युद्धमान राहणार, असे घोषित केले. त्यांनी मुसलमानपण सोडण्यास नकार दिला. हिंदूंनी सक्ती केली नाही. उलट त्यांच्या इच्छेला मान देऊन त्यांना स्वतंत्र आणि सार्वभौम पाकिस्तानची भेट दिली. ठराव केल्यानंतर सात वर्षे इतक्या अल्पावधीत  राष्ट्र म्हणून आकारास आलेले पाकिस्तान हे जगातील एकमेव आश्चर्य असावे. या औदार्याकरिता मुसलमानांनी हिंदूंना धन्यवाद द्यायला हवे होते, पण हसत हसत आपण पाकिस्तान हिसकावून घेतले याचा उन्माद चढला आणि त्या भरात त्यांनी लुटालूट, कत्तली, सामूहिक बलात्कार, बाटवाबाटवी, जाळपोळ इत्यादी निर्घृण प्रकारांनी माणुसकीचा थरकाप उडविणारे जे भयाचे साम्राज्य सर्वत्र उभे केले त्याच्या भयाण छायेतून हिंदू मानसिकता अजूनही पूर्णपणे बाहेर पडू शकलेली नाही.

सत्तेचाळीसनंतर जे भारतात राहिले त्यांची मानसिकता फाळणीपूर्व काळातील राहिली आहे. त्याचे कारण मुस्लिम लीगचा 1910चा ठराव आहे हे लक्षात घेतले जात नाही. भारतात आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून राजकीय उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर हिंदूंना जे अमृत ते मुसलमानांना विष वाटले पाहिजे असा आदेश देणारा हा ठराव आहे. तो हिंदूंना माहीत नाही, मग तो मागे घ्या, अशी मागणी ते कशी लावून धरणार? म्हणून अयोध्येत बाबरी मशिदीच्या ठिकाणी राममंदिर अस्तित्वात होते हे सर्वप्रकारे सिद्ध होऊनही मुल्लामौलवी मंदिर निर्माण होऊ देत नाहीत. बाबरी मशीद पाडली, पण अयोध्येतील अन्य सर्व मशिदी सुरक्षित राहिल्या आणि एकाही मुसलमानाने स्थलांतर केले नाही. यावरून हिंदूंचा निषेध प्रतीकात्मक आणि तेवढ्यापुरता होता तसेच त्यात धार्मिक उन्माद नव्हता हे अमेरिका का लक्षात घेत नाही? याउलट काश्मिरातून लाखो पंडितांना हाकलवून लावले जात आहे. हिंदूंचा काश्मीर खोर्‍यातून निर्वंश होत आहे. पाकव्याप्त काश्मीर मुक्त करा, असा भारताच्या संसदेचा आदेश आहे. या आदेशाचे पालन करू शकणारे पहिले सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले आहे, याची संबंधितांना चिंता वाटत आहे. कारण काश्मीर खरोखरंच भारताचा अविभाज्य भाग बनले आणि ते मानसिकदृष्ट्या उर्वरित भारताशी पूर्णपणे समरस झाले, तर युरोपीय आणि काही इस्लामी राष्ट्रांना तसेच अमेरिकेला आशियाच्या राजकारणात अवाजवी हस्तक्षेप करता येणार नाही. म्हणून भारतात मुस्लिम असुरक्षित अशी बोंब मारण्यात येत आहे. जगात कोठेही म्हणजे पाकिस्तानातही मुसलमान सुरक्षित आणि सुखी नाहीत तेवढे ते भारतात आहेत. कारण ते हिंदूंच्या सहवासात आहेत. हिंदूंचा सहवास ही सर्वांत मोठी सुखी जीवनाची, विश्वासाची ठेव आहे. हा विश्वास मोदी सरकार निर्माण करीत आहे आणि मुसलमानांना  विशेषतः महिलांना त्याची जाणीव होऊ लागली आहे. तेव्हा अमेरिका काय म्हणते याने दचकून न जाता हिंदूंनी मुसलमानांशी त्यांचे लांगुलचालन न करता सहोदर या नात्याने प्रेमपूर्वक संपर्क वाढवत राहिले पाहिजे. असो.

-अरविंद विठ्ठल कुळकर्णी (मो. क्र. 9619436244)

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply