भाजप नेते अण्णा कंधारे यांचा इशारा; शेगवाडा परिसरातील लोकांना वेठीस धरण्याचे काम
मुरूड : प्रतिनिधी
शहरातील शेगवाडा परिसरातील नाल्यावर मुरूड नगर परिषदेने केलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यात तेथील घरांत व बागायत जमिनीत पाणी घुसून नागरिकांच्या मालमतेचे नुकसान होणार आहे. हे बांधकाम त्वरित तोडावे, अन्यथा जनआंदोलन उभे करून नगर परिषदेला जेरीस आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते अण्णा कंधारे यांनी दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. मुरूडमधील शेगवाडा परिसरातील अपार्टमेंट हॉटेलसमोर असलेल्या नाल्यावर मुरूड नगर परिषदेने या भागातील लोकांना विश्वासात न घेता बांधकाम केले आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे नगर परिषदेने आठ फूट उंच व 20 फूट रुंदीचे बांधकाम करणे आवश्यक होते, मात्र त्यापेक्षा छोट्या प्रमाणात काम करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील नागरिकांची मते विचारात न घेता नगर परिषदेने मनमानी कारभार करून नाल्यावर बांधकाम करून शेगवाडा परिसरातील लोकांना वेठीस धरण्याचे काम केल्याचा आरोप अण्णा कंधारे यांनी या वेळी केला. नगर परिषदेने केलेल्या या बांधकामामुळे पहिल्याच पावसात हा नाला अर्ध्याहून अधिक भरला असून, पाऊस सतत पडत राहिला तर शेगवाडा परिसरातील लोकांच्या घरांत व बागायत जमिनीत पाणी घुसणार असल्याची शक्यता अण्णा कंधारे यांनी व्यक्त केली. हे बांधकाम तातडीने तोडले नाही, तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा अण्णा कंधारे यांनी मुरूड नगर परिषदेला दिला आहे.