पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी पोहून विक्रम करीत असून, आता त्याचे पुढील लक्ष्य हे कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन मिळविणे आहे. यासाठी तो लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे.
19 वर्षीय प्रभातने आजवर जगातील सहा समुद्र पार केले आहेत. आता कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन पूर्ण करण्यासाठी तो प्रशांत महासागरात पोहायला उतरणार आहे. वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनच्या मान्यतेनुसार ऍना कॅपा ते मेनलँड (सांताबारबरा), लेक तहाऊ आणि कॅटरिना चॅनेल हे कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन म्हणून ओळखले जातात. यातील कॅटरिना चॅनेल प्रभातने 2016 साली पोहून पार केले होते. पुढचा टप्पा ऍना कॅपा ते मेनलँड हे 20 किमीचे अंतर पूर्ण करण्याकरिता तो 3 जुलै रोजी तेथील समुद्रात उडी घेईल. त्यानंतर 17 जुलैला 30 किमी अंतर असणारा लेक तहाऊ प्रभात पोहणार आहे. याठिकाणच्या पाण्याचे तापमान 12 ते 15 अंश असते. शिवाय येथे ऑक्सिजनची मात्राही कमी असते. त्यामुळे प्रभातचा कस लागेल.
उरणच्या प्रभातची ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन मिळविणारा तो पहिला भारतीय जलतरणपटू ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, कॅनडा, इंग्लंड आणि मेक्सिको या देशांतील अवघ्या 13 जलतरणपटूंनी हा मानाचा मुकुट परिधान करण्यात यश मिळविले आहे. या मोहिमेसाठी प्रभातला रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.