लंडन : वृत्तसंस्था
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील प्रबळ दावेदार असलेले दोन संघ भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये रविवारी (दि. 30) साखळी सामना रंगणार आहे.
भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसर्या, तर इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय संघाला एक विजय पुरेसा आहे. दुसरीकडे इंग्लंडला सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे हा सामना यजमानांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
भारत-इंग्लंड यांच्यांत आतापर्यंत 99 सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने 53 आणि इंग्लंडने 41 सामने जिंकले आहेत. उभय संघांत दोन सामने बरोबरीत सुटले, तर तीन सामने अनिर्णीत राहिले. वर्ल्ड कप स्पर्धेत हे संघ सातवेळा समोरासमोर आले आणि त्यात दोघांनी प्रत्येकी तीन विजय मिळवले आहेत. यापैकी इंग्लंडमध्ये खेळलेल्या तीनपैकी दोन लढती भारताने जिंकल्या आहेत.
भारतीय संघ भगव्या जर्सीत
भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत निळ्या जर्सीने सर्व सामने खेळले आहेत, मात्र आता इंग्लंडच्या जर्सीचा रंग निळा असल्याने त्यांच्याविरोधात भारताला नव्या भगव्या जर्सीमध्ये खेळावे लागणार आहे. भारतानेच का जर्सीचा रंग बदलायचा, इंग्लंडने आपल्या जर्सीचा रंग बदलावा, असे काही जणांचे म्हणणे आहे, पण नियमानुसार यजमान संघाच्या जर्सीचा रंग बदलला जात
नाही. त्यामुळे इंग्लंडला यामधून सुट मिळाली आहे. परिणामी टीम इंडिया निळीऐवजी भगवी जर्सी घालून हा सामना खेळणार आहे.