गैरहजर अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस

म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा तालुका समन्वय समितीची सभा नुकताच समितीचे अध्यक्ष शैलश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात झाली. या बैठकीमध्ये तालुक्यातील कामचुकार अधिकार्यांची झाडाझडती घेण्यात आली, तर गैरहजर अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली.
समितीचे अध्यक्ष शैलश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीला पंचायत समिती सभापती छाया म्हात्रे, समितीचे सचिव तथा तहसीलदार शरद गोसावी, समिती सदस्य नंदकुमार सावंत, मंगेश म्हशिलकर, तुकाराम पाटील, महेश पाटील, कल्पना कोठावळे, धनश्री मुंढे, गटविकास अधिकारी वाय. एम. प्रभे, नायब तहसीलदार के. टी. भिंगारे, तालुका कृषी अधिकारी एम. एम. भांडवलकर, वन क्षेत्रपाल निलेश पाटील, आगार व्यवस्थापक रश्मी गाडेकर, पाणीपुरवठा उपअभियंता वा. एम. गांगुर्डे, महावितरणचे यादव इंगळे, गटशिक्षण अधिकारी संतोष शेडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पी. टी. जथ्थे, व्यंकट तरवडे, नगरपंचायत प्रतिनिधी दीपाली मुंड्ये, म्हसळा व मेंदडी सर्कल दत्ता कर्चे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
म्हसळा शहरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजना, भूमी अभिलेख कार्यालयाबाबत येणार्या तक्रारी, बचतगट विक्री केंद्राची पर्यायी व्यवस्था काय केली, कृषी योजनांची माहिती शेतकर्याना वेळेवर न मिळणे, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती आदींबाबत सभेमध्ये चर्चा झाली.