पेण ः पेण तालुक्यात भाजपची ध्येयधोरणे व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी गागोदे येथील शिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, भाजप युवा मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी आपल्या विभागातील पक्षाचे कार्यकर्ते, नेते यांच्याशी समन्वय साधून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम राबवून पक्षवाढीत योगदान द्यावे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. पेणमध्ये माजी मंत्री रवीशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे राबवून सामाजिक कार्यात अग्रेसर भूमिका घेऊन पक्ष वाढवणार, असे मत या वेळी नवनियुक्त तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले.
कर्जतमध्ये प्रगतशील शेतकर्यांचा सन्मान
कर्जत ः कर्जत प्रेस क्लबच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे तालुक्यातील तीन प्रगतशील शेतकर्यांचा त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सन्मान केला जाणार आहे. कृषिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रगतशील शेतकर्यांचा सन्मान केला जातो. यावर्षी चंद्रकांत कडू, तुकाराम हाबळे आणि वामन कराळे या तीन शेतकर्यांना सन्मानित केले जाणार आहे. पोशिर येथील शेतकरी तुकाराम हाबळे यांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरी पिकविली होती, तर बेकरे येथील शेतकरी वामन कराळे हे उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला शेती करतात. ज्येष्ठ आणि अनुभवी शेतकरी साळोख येथील चंद्रकांत कडू हे दुबार शेती करणारे शेतकरी आहेत. ते स्वतः कवीदेखील असून या तिन्ही शेतकर्यांना कर्जत प्रेस क्लबकडून सन्मानित करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रम साळोख येथील चंद्रकांत कडू यांच्या शेतावर होईल. तहसीलदार अविनाश कोष्टी, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी आणि तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे हे उपस्थित राहणार असून कृषी विभागाच्या विशेष प्रकल्प अधिकारी भाग्यशाली शिंदे यांचे मार्गदर्शन शेतकर्यांना मिळणार आहे.
‘पेणमध्ये रोजगार उपलब्ध करणार’
पेण : तालुक्यातील प्रकल्पग्रस्त आणि तरुणांना या पेण परिसरातील कंपन्यांत नोकर्या देण्याबाबत प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष तसेच रायगड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जगदीश गायकवाड यांनी पेण येथे दिली. रायगड जिल्हा नियोजन मंडळावर सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल पेण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व दीपकभाऊ सामाजिक संघटना यांच्या वतीने जगदीश गायकवाड यांचा नुकताच पेण येथील हॉटेल मंथनमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पेण परिसरात जेएसडब्ल्यू तसेच इतर मोठ्या कंपन्या आल्या आहेत, मात्र त्यात स्थानिक तरुणांना नोकरीत प्राधान्य दिले जात नाही. ही बाब चुकीची आहे, अशी खंत गायकवाड यांनी या वेळी व्यक्त केली. रिपाइंचे पेण तालुकाध्यक्ष चिंतामण कांबळे, दीपकभाऊ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, अलिबाग तालुकाध्यक्ष सुनील सत्वे, पेण तालुका संपर्कप्रमुख विनोद जोशी, रोहा तालुकाध्यक्ष संतोश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. युवा कार्यकर्ते विनोद जोशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केेले होते.
निवृत्त प्राचार्य सुरेश पाटील अध्यक्षपदी
पेण : अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेची पेण येथे सभा झाली. या सभेत कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली असून, शाखेच्या अध्यक्षपदी निवृत्त प्राचार्य सुरेश हरिश्चंद्र पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या वेळी निवडण्यात आलेल्या पदाधिकार्यांत गजानन तुकाराम भोईर व मीनाक्षी देवदत्त पाटील (उपाध्यक्ष), दिनानाथ वेटू पाटील (कार्याध्यक्ष), मधुकर दामोदर रूठे (सरचिटणीस), पांडुरंग विठ्ठल घरत (सहचिटणीस), शरद शंकर पाटील (खजिनदार), दामोदर हरी भोईर (सहखजिनदार) यांचा समावेश आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून केशव कमळ कुथे, गणेश जनार्दन पाटील, लवेंद्र धर्मा मोकल, भूमिका पिंगळे, सीताराम यशवंत लांगी, परशुराम बाबूराव पाटील, प्रसिद्धिप्रमुख म्हणून प्रकाश बाबू माळी, कायदेशीर सल्लागार म्हणून अॅड. महेंद्र बळीराम म्हात्रे आणि सल्लागार म्हणून राजाराम विठोबा ठाकूर, पांडुरंग यशवंत पाटील, अनंत देवीदास भुरे, सिद्धेश दिनकर म्हात्रे, अशोक महादेव म्हात्रे यांची निवड झाली आहे.
मिहीर कुलकर्णी इटलीला रवाना
रोहा ः लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या युथ एक्स्चेंज कार्यक्रमांतर्गत लायन्स क्लब ऑफ रोहाचा मिहीर प्रद्युत कुलकर्णी (17) याला बोलोना (इटली) येथे होणार्या कॅम्पमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. मिहीर हा जे. एम. राठी इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी असून, त्याने दहावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण प्राप्त केले आहेत. तो इटलीला रवाना झाला असून, तेथे तो कॅम्पपूर्वी दोन आठवडे दोन इटालियन कुटुंबांच्या घरी राहणार आहे. बोलोना येथील कॅम्पमध्ये 25 देशांचे युवक सहभागी होणार असून, त्यात काही अंध मुलांचाही समावेश आहे. त्यांच्यासोबत 10 दिवस एकत्र राहून ही मुले त्यांच्या दृष्टिहीनतेवर कशा प्रकारे मात करून जीवन जगतात हे प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिहीरला मिळणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी सदस्य आपल्या देशाविषयी स्लाइड शोद्वारे माहिती देणार आहे.