अलिबाग : प्रतिनिधी
युनियन बँक ऑफ इंडीया अलिबाग शाखा शिपाई पदावर काम करणार्या नथुराम पवार याच्या हात्येप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. निलेश पवार असे या आरोपीचे नाव असून त्याला 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याचा साथिदार साहील राठोड याचा पोलीस शोध घेत आहेत.
नथुराम पवार हे 13 मार्चपासून बेपत्ता होते. बँकेत कामावर गेलेले नथुराम घरी परतले नसल्याने त्यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची फिर्याद अलिबाग पोलीस ठाण्यात नोंदवली होती. ब्राम्हण आळीतील चहा टपरीजवळ त्यांची गाडी पार्क केली असल्याचे आढळून आले होते. 14 मार्च रोजी अलिबाग तालुक्यातील पाल्हे येथे त्यांचा मृतदेह आढळून आला होता. तिक्ष्ण हत्याराने अनेक वार करून त्यांची हत्या करण्यात आली.
या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला होता.
नथुराम पवार बेपत्ता असल्याची फिर्याद नथुरामच्या पत्नीने दिली. त्यानंतर निलेश पवार व सहिल राठोड नथुरामचा पत्नीसोबत पोलीस ठाण्यात आले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा पुटेज पाहिले तेव्हा निलेश व साहिल नथुराम सोबत दिसत होते. त्यामुळे पोलिसांना या दोघांवर संशय आला. पोलिसांनी दोघांशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते पनवेलमध्ये असल्याचे समजले. आरोपींच्या शोधासाठी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय जाधव, पोलीस अमलदार सुनील फड, पोलीस अमलदार अनिकेत म्हात्रे यांचे पथक तयार करण्यात आले.
सोलापूरात आरोपी ताब्यात
दोन्ही आरोपी कर्नाटक राज्यात गेले होते. तेथून तेलंगणात आले. निलेश पवार याला सोलापूर येथून या पथकाने अटक केली. साहिल राठोड अद्याप फरार आहे. निलेश पवार याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. साहिल राठोड याचा पोलीस शोध घेत आहेत. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस पुढील तपास करत आहेत.