व्यावसायिकांना जागा खाली करण्याचा आदेश
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/06/Nagothane2-1-1024x768.jpg)
नागोठणे ः प्रतिनिधी
सलग दोन-तीन दिवस पडणार्या पावसाने शनिवारी सायंकाळी येथील चिकन-मटण बाजाराच्या मुख्य इमारतीची पश्चिम बाजूकडील भिंत कोसळण्याची दुर्घटना घडली असून यात कोणीही जखमी झाले नाही. इमारत जुनी झाली असली तरी ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे काही जणांकडून सांगण्यात आले. ही दुर्घटना घडल्यानंतर ग्रामपंचायतीकडून येथे व्यवसाय करणार्या 19 विक्रेत्यांना तातडीने सर्व इमारत खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या विक्रेत्यांकडून ग्रामपंचायत भाड्यापोटी दररोज 20 रुपयांची पावती फाडण्यात येते, असे काही विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. याबाबत सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांना विचारले असता इमारत धोकादायक वळणावर आली असल्याने मोठी घटना घडू नये यासाठी सर्व विक्रेत्यांना जागा खाली करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात रोहे पंचायत समितीकडे पत्रसुद्धा पाठवून देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विक्रेते ग्रामपंचायतीला दररोज 20 रुपये देतात हे मुद्द्याला धरून नसून प्रत्यक्षात यातील काही जणांकडून भाड्यापोटी साधारणतः चार लाख रुपये येणे असल्याचे त्यांनी सांगितले. या विक्रेत्यांची सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.