Breaking News

पाकला चोख प्रत्युत्तर दिल्यानेच अभूतपूर्व विजय

गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

नाशिक ः प्रतिनिधी

देशाच्या सीमा सुरक्षित कशा राहतील याची मतदारांना काळजी होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशातील जनतेला देशाच्या सुरक्षेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारविषयी विश्वास निर्माण झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत 303 जागांवर भाजपचे खासदार निवडून दिल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले. नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीच्या समारोप सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलेत होते.

देशात 303 जागा मिळतील असे आम्हालाही वाटले नव्हते, परंतु या वेळी केवळ लाट नव्हती, तर त्सुनामी होती. गेल्या पाच वर्षांत सरकारने केलेल्या कामाची पावती मतदारांनी दिली. आता राज्यातही मुख्यमंत्र्यांचीच हवा आहे. सरकारने पारदर्शक काम केले. अनेक प्रश्न चुटकीसरशी संपविले. 50 वर्षांत निघाले नाही एवढे मोर्चे निघाले. मराठा आंदोलनासह अनेक मोर्चे निघाले. त्या सर्वांवर सरकारने तोडगा काढला. आरक्षणाविषयी कोर्टाने निर्णय दिल्याने विरोधकांचे तोंड बंद झाल्याचेही महाजन म्हणाले.

विरोधकांवर टीका करताना त्यांनी काँग्रेसचे राज्यात 50 आमदाराही निवडून येणार नसल्याचे सांगितले. लोकसभेत राहुल गांधी यांच्या विरोधातील जागा जिंकली, मात्र बारामतीमध्ये थोडे कमी पडलो असलो तरी अनेक दिग्गजांना नेस्तनाबूत केले. अजित पवार, नारायण राणे यांच्या मुलांचा पराभव केला, तर अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांनाही पराभवाचा सामना करावा लागल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. लोकसभेत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी झाले आहे. काँग्रेसची केवळ एक जागा राज्यात आली, नाहीतर संपूर्ण राज्य  काँग्रेसमुक्त झाले असते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचीही अवस्था बिकट असून काँग्रेसच्या तीन नेत्यांची तोंडे तीन दिशेला आहेत. त्यांचा विरोधी पक्षनेताच आपल्याकडे आला असून अजून अनेक जण येण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसमध्ये राहायला कोणीही तयार नसून पक्षाध्यक्षपद सांभाळण्यासही कोणीही समोर येत नसल्याची टीकाही गिरीश महाजन यांनी या वेळी केली.

परिश्रम केल्याशिवाय संधी नाही

भाजपच्या महिला मोर्चा पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना पदाधिकर्‍यांनी, लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. लोकांसाठी काम करताना जमिनीवर राहून काम करा. पक्षात परिश्रम केल्याशिवाय कोणालाही संधी मिळणार नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply