Breaking News

आरोपी बांधकाम व्यावसायिकांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

संरक्षक भिंत कोसळून मृत्यू प्रकरण

पुणे ः प्रतिनिधी

 शुक्रवारी रात्री पुण्यातील कोंढवा भागात सीमा भिंत कोसळून 15 कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल यांना अटक केली होती. त्यांना रविवारी (दि. 30) जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी रात्री 1.30च्या सुमारास कोंढवा भागातील आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी आठ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. कांचन डेव्हलपर्सच्या पंकज व्होरांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच आल्कन स्टायलस उभारणार्‍या चौघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी आल्कन स्टायलस इमारत उभारणारे बांधकाम व्यावसायिक विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने त्यांना 2 जुलैपर्यंत  पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्र्यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत माहिती दिली. पुणे दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येईल. अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच 24 तासांत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply