पनवेल : प्रतिनिधी – कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी महापालिकेच्या माजी शिक्षण सभापती विद्याताई गायकवाड आणि तळोजा येथील रफ बटालियनचे असिस्टंट कमांडंट सुधीर सोनवणे यांच्या उपस्थितीत शनिवारी झाला.
शनिवारी (दि. 29) कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील नवनियुक्त विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ झाला. यावेळी नवनियुक्त विद्यार्थी मंत्रिमंडळातील सदस्यांनी शालेय विकासासाठी आपल्या जबाबदार्या कशा पद्धतीने पार पाडाव्यात याबाबत महापालिकेच्या माजी शिक्षण सभापती विद्याताई गायकवाड यांनी त्यांना मार्गदर्शन केले. पूर्व प्राथमिक, माध्यमिक विभागातील नवनियुक्त विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्राचार्या रंजना चाफले यांनी शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळातील सदस्यांना आपली कर्तव्य प्रामाणिकपणे व विश्वासाने पार पाडण्याचा सल्ला या वेळी देऊन पाहुण्यांचे आभार मानले.