
उरण : रामप्रहर वृत्त
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, औषधे यासारख्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले. या सेवा 24 तास सुरु राहणार आहे. मात्र उरणच्या मासळी, चिकन-मटण व भाजीपाला मार्केटमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी आटोक्यात येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या वाढत्या गर्दीला आवर घालण्याची मागणी केली जात आहे. उरण कोटनाका, वीर सावरकर मैदान व उरण चारफाटा मार्केट येथे उरणकर मासळी, चिकन-मटण व भाजी खरेदी करताना दिसतात. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गर्दी न करण्याचे आवाहन करूनही त्याला न जुमानता एखाद्या यात्रेसारखी माणसे खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यावरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेने गर्दी करु नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार जनतेला करीत आहेत. पण जनता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. अनेक ठिकाणी झुंडीने गर्दी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. काही ठिकाणी तर पहाटेच्या सुमारास मासळी मार्केट भरत असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे. त्यामुळे ही गर्दी अशीच होत राहिली तर कोरोनाचा उरणमध्ये प्रादुर्भाव होण्यास वेळ लागणार नाही, अशी चर्चा येथील जनतेत सुरू होती. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन ठोस उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.