महाड : प्रतिनिधी – अवघ्या नऊ महिन्यात महाड तालुक्यातील 900 महिलांना कुक्कुटपालन व्यवसाय निर्माण करून देणार्या चाईल्ड फंड संस्थेचे महिला सक्षमीकरण कामात महत्वाचे योगदान असल्याचे मत आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केले.
चाईल्ड फंड इंडिया या संस्थेच्या ‘गरीबीतून समृद्धीकडे‘ या प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्याचे उद्घाटन आमदार गोगावले यांच्या हस्ते नुकतेच महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेच्या या कामात शासन स्तरावर लागणारी सर्व मदत करण्यास आपण पुढाकार घेवू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कुक्कुटपालन या व्यवसायाकरिता ग्रामीण भागातील महिलांना प्रेरित आणि प्रशिक्षण देऊन चाईल्ड फंड संस्थेने त्यांना व्यवसाय उभा करून दिला आहे. हे काम कौतुकास्पद आहे. महिलांची जिद्द, आत्मविश्वास तर संस्थेची प्रेरणा यामुळे या महिला व्यवसायात यशस्वी झाल्या असल्याचे मत आमदार गोगावले यांनी व्यक्त केले.
आपला प्रपंच संभाळून महिला आपल्या रोजगाराचा मार्ग निवडत आहेत. त्यांचा आत्मविश्वास आमची प्रेरणा असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या नीलम मखीजनी यांनी यावेळी केले. रायगड जिल्हा हा प्रगतीच्या टप्प्यावर असून याठिकाणी अशा प्रकारच्या व्यवसायाला मोठी मागणी आहे. याचा विचार करून संस्थेने हा चांगला व्यवसाय येथील महिलांना निर्माण करून दिला आहे, असे पशुपालन विभागाचे सह आयुक्त डॉ. चंद्रकांत अपशिंगे यांनी स्पष्ट केले. संस्थेच्या माध्यमातून यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उर्वरित महिला लाभार्थींना कुक्कुटपालनाकरिता पिलांचे वाटप करण्यात आले. यावेळी पोल्ट्री प्रकल्प पेणच्या डेव्हलपमेंट अधिकारी डॉ. अर्चना जोशी यांच्यासह लाभार्थी महिला उपस्थित होत्या.